पुणे-फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलनाला मनसेने काल दोन दिवसांचा अवधी दिला असताना आज दुपारी काही कार्यकर्त्यांनी राजाराम पूल आणि फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील फेरीवाल्यांवर अटॅक आंदोलन केले. या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांचे विक्रीसाठी मांडलेल्या वस्तू, सामान, फळे रस्त्यावर इतरस्ततः फेकून देण्यात आली .आणि मनसे च्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या .
मुंबई मधील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेकडून आक्रमक आंदोलन केले जात आहे. आता मुंबई पाठोपाठ पुण्यातही परप्रांतीय अनधिकृत फेरीवाले मनसेच्या रडार वर आले आहेत. फेरीवाल्यांवर दोन दिवसांत कारवाई करण्याचे पत्र मनसेकडून यापूर्वी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले होते. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला होता. मात्र, या दोन दिवसात फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई झाली नाही. तथापि मनसे पदाधिकारी मुंबईत व्यस्त असल्याने पुण्यातील आंदोलन आणखी दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे मनसेकडून कालच सांगण्यात आले होते.मात्र आज गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे गट करून शहरातील विविध भागांत पाठविण्यात आले.
जंगली महाराज रस्त्यावर कपडे, खाद्यान्न, पाणीपुरी विकत असलेल्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यांचे स्टॉल उधळून लावण्यात आले. काही जणांना धक्काबुक्कीही करण्यात आली. पादत्राणांच्या दुकानांनाही या आंदोलनाचा फटका बसला. राजारामपुलावरील फळविक्रेत्यांवर हल्ला करीत या विक्रेत्यांचे सर्व सामान, फळे रस्त्यावर फेकून दिली. तसेच फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता येथेहीकार्यकर्त्यांनी तोडफोड केली. फेरीवाल्यांचे साहित्य रस्त्यावर फेकून दिले.