नव्या काळाची आव्हाने पेलणारी शिक्षण पध्दती निर्माण करावी लागेल : डॉ. माणिकराव साळुंखे
पुणे :’शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून, भावी काळाची आव्हाने पेलणारी, पुढच्या पिढीचे प्रश्न सोडवणारी शिक्षणपध्दती निर्माण करावी लागेल’, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ चे वितरण भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी आझम कॅम्पस येथे शानदार कार्यक्रमात झाले. त्यावेळी डॉ. साळुंखे बोलत होते.
गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे चंद्रकांत दळवी (विभागीय आयुक्त, पुणे), मुकेश माचकर (महाराष्ट्राचे पहिले मतपोर्टल ‘बिगुल’ चे संपादक), सुवर्णा गोखले (ज्ञान प्रबोधिनी, स्त्री शक्ती प्रबोधन प्रमुख, ग्रामीण विभाग) आणि ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’, कुरूंजी, ता. भोर, (ग्रामीण भागात पर्यावरणपूरक गृह बांधणी, पर्यटन प्रकल्प उभारणी) यांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला .
डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, ‘सध्याची शिक्षणपध्दती ही डाव्या मेंदूला कामाला लावणारी आहे, मात्र, संशोधनासह अनेक महत्वपूर्ण कामांसाठी उजवा मेंदू वापरला जाणे आवश्यक आहे.
काळ बदलत असून, नव्या पिढीसमोर वेगवेगळे प्रश्न उभे राहत आहेत. अशा वेळी आगामी काळाची आव्हाने पेलणारी शिक्षण पध्दती निर्माण करावी लागेल. सर्वांना प्रगतीची समान संधी दिली तरच देशाची प्रगती होईल.
‘लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शक पत्रकारितेला प्रोत्साहन देणे, स्त्रियांना विकासाची समान संधी देणे आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचे मॉडेल उभारणे यासाठी कार्य करणाऱ्यांना या सन्मान सोहळ्यात गौरविण्यात आले, हा अत्यंत आगळावेगळा उपक्रम आहे, समुहाची आणि समाजाची कार्यक्षमता, गुणवत्ता वाढविण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतील ‘, असेही ते म्हणाले.
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, ‘या सामाजिक कृतज्ञता सन्मानामुळे अधिक काम करायला बळ मिळाले आहे. डॉ.पी.ए. इनामदार हे मागे पडलेल्या समाजाला शिक्षणाद्वारे पुढे आणण्यासाठी उच्च कोटीचे काम शांतपणे करीत आहेत. आदराने पाहावे असे हे व्यक्तीमत्व असून त्यांच्या नावचा सामाजिक कृतज्ञता सन्मान मिळाला, याचा आनंद वाटतो.’
‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’, कुरुंजी (ता.भोर) च्या वतीने संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, गणेश जाधव, अमृता देवगावकर यांनी सन्मान स्विकारला.
‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ डॉ. व्ही. एन. जगताप (प्राचार्य, एम.सी.ई.सोसायटी ची ’इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी डिप्लोमा’) आणि खतीब अजाझ हुसेन (हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट’चे कर्मचारी) यांना देण्यात आला .
मुकेश माचकर, सुवर्णा गोखले, मंदार देवगावकर, डॉ. व्ही. एन. जगताप, खतीब अजाझ हुसेन यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) च्या असेंब्ली हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला .
‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे सन्मान दिले जातात. यावर्षी पी.ए.इनामदार यांचा 73 वा वाढदिवस असून, सन्मानाचे नववे वर्ष होते. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व शाल असे या सन्मानाचे स्वरूप आहे.
चंद्रकांत दळवी, डॉ.व्ही.एन. जगताप यांनी पुरस्काराची रक्कम समाजोपयोगी कामासाठी संस्थेकडे सुपूर्द केली.
दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले, एम सी ई सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम यांनी आभार मानले. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस एन पठाण, सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, सारिका रोजेकर आणि सचिन सूर्यवंशी उपस्थित होते .