पुणे-
वडगाव येथील नवले पुलाखाली कात्रजहून येणाऱ्या सीमेंट-काँक्रिट मिक्स घेऊन जाणा-या टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला. यात एका तरुणीचा मृत्यू झाला. तर दोनजण जखमी झाले आहेत. आज (शुक्रवार) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात घडला. स्वाती मधुकर ओरपे (वय-29) असे मयत महिलेचे नाव आहे.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले कि, आज दुपारी दोनच्या सुमारास कात्रजहून लुंकड ट्रान्सपोर्टचा एक मिक्स सीमेंट काँक्रिट घेऊन जाणारा टँकर येत होता. त्यावेळी नवले पुलाखाली आल्यानंतर भरधाव वेगातील टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट समोरील विश्व आर्केड कॉम्पलेक्सच्या आवारात घुसला. त्यावेळी दोन वाहनांना ठोकरत आवारातील पाणीपुरी स्टॉलला उडवून तळमजल्यावरील सिरवी मिठाईवाले या दुकानात घुसला.
घटनेवेळी मयत स्वाती ही नाश्ता करण्यासाठी आली होती. ती टँकरच्या समोरील चाकाखाली अडकली. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ तिची मदत करण्यासाठी धाव घेतली. पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. टँकर बाजूला हटवून तिचा मृतदेह बाजूला काढण्यात आला. घटनेत अन्य दोनजणही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.