समतोल आणि सर्वांगीण विकासाचे अंदाजपत्रक : महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे- पुण्यात वाजपेयी हॉस्पिटल आणि चांदनी चौकात 50 एकर जागेत शिवसृष्टी नक्की होईल असा दावा करत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अन्दाजपत्रकाचे कौतुक केले आहे.( दरम्यान शिवसृष्टी साठी 26 कोटी तर कोथरुड कला अकादमी साठी 20 कोटी तरतूद या अन्दाजपत्रकाचे वैशिष्टय ठरणार आहे,)
महापौरांनीअसे म्हटले आहे की,७ हजार ३९० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात ४८% रक्कम विकासकामाला आणि भांडवलीकामांना दिली आहे. म्हणजेच शहरातील एकूण विकासकामासाठी या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याचे अणि नव्याने काही प्रकल्प उभे करण्याचा संकल्प अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. या अंदाजपत्रकात उत्पादन वाढीसाठी विशेष भर दिलेला आहे. दरवर्षी जमाबाजू ४३००-४४०० कोटीच्या दरम्यान दिसते, पण यावर्षीच्या अर्थसंकल्पात ७३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. अर्थसंकल्पाचे थोडक्यात वर्णन करायचे तर समतोल अणि सर्वागीण विकास साधण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकातून करण्यात आला आहे.
जमा अणि खर्चाच्या दोन्ही बाजू पाहिल्यावर त्याच्यामधे योग्य असा समन्वय साधला आहे, असे म्हणता येईल. महापालिकेत भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर जुन्या योजना कायम ठेवून, नवीन काही योजना आणण्याचे संमिश्र नियोजन अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. मुंबईसारख्या शहरात ५५% नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात, परंतु त्यामानाने पुण्यामध्ये प्रतिसाद कमी आहे. त्यासाठी सगळ्या भागामध्ये बसेस उपलब्ध करून देणे, इलेक्ट्रिक बस, मिनी बस असे पर्याय अर्थसंकल्पात समाविष्ट केले आहेत.
मिडीबसच्या माध्यमातून वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी १० रुपयांत दिवसभर प्रवास हा चांगला उपाय शोधला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठा, लक्ष्मी रोड, तुळशीबाग, मंडई या भागात मोठ्या प्रमाणात विविध भागांतून लोक खरेदीसाठी येतात, म्हणून नागरिकांना कमी पैश्यामध्ये चांगली सार्वजनिक व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. ही योजना यशस्वी होईल अणि पुणेकरांना ही चांगली भेट अर्थसंकल्पातून मिळेल.
शिवसृष्टी करणे हे भारतीय जनता पक्षाचे कर्तव्य आहे. चांदणी चौकातील बीडीपी क्षेत्रातील ५० एकर जागेमध्ये शिवसृष्टी तयार करण्याची मान्यता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली होती. ती जागा ताब्यात घेणे, मालकांना त्यांचा योग्य मोबदला कशाप्रकारे देणे यासाठी जिल्हाधिकारीच्या मार्फत भूसंपादनाची कार्यवाही प्राथमिक स्तरावर सुरू आहे. त्या अडचणी लवकरच दूर करून, त्या जागेत शिवसृष्टी नक्की होईल.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरू होणारे वैद्यकीय महाविद्यालयालाही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. ट्रस्ट स्थापन करून त्याद्वारे महाविद्यालय सुरू करण्यासाठी मुख्य सभेने मान्यता दिली आहे, तर राज्यसरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहे. राज्यसरकारची मान्यता आल्यानंतर लगेचच कार्यवाही सुरू होईल व लवकरात लवकर २०२१ मध्ये महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशा प्रकारचे काम सध्या सुरू आहे. असे महापौरांनी स्पष्ट केले आहे .