गळती प्रकरणी दोषींवर कारवाई होणार -महापौर (व्हिडिओ)
पुणे- महापालिकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळीच सभागृहाला गळती लागली होती, त्यावर आज (शुक्रवार) महापौरांनी ही गळती छतावरील कचरा अडकल्याने पाईप चोकअप होऊन झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे स्पष्टीकरण पत्रकार परिषदेत दिले. तसेच याला जबाबदार असलेल्या कर्मचारी, ठेकेदार तसेच संबंधीत अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाईच्या सुचना दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुण्याची नाचक्की केल्याचा विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप पुणे महापालिकेच्या नव्या इमारतीचा काल (गुरुवारी) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बाहेर मुसळधार पाऊस सूरु झाला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना सभागृहाला गळती लागल्याचे चित्र दिसून आले होते. त्यानंतर उपराष्ट्रपतींसमोर पुण्याची नाचक्की केल्याचा आरोप विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर केला होता.
बांधकामात दोष नसल्याचे महापौरांचे स्पष्टीकरण
सभागृहाच्या गच्चीवर कचरा साचला होता. तो पावसाच्या पाण्यामुळे पाईपच्या तोंडाशी येऊन अडकल्याने पाईप चोकअप झाला. त्या ठिकाणी पाणी साचून पाठीमागील खिडकीतून पाण्याची सभागृहात गळती लागली. यासंदर्भातील संबंधीत विभागाने त्याची दुरुस्ती केली आहे. मात्र, ज्यांच्याकडे स्वच्छतेची जबाबदारी होती. त्यांची चौकशी करण्यासंदर्भात सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यामध्ये बांधकामाचा कोणताही दोष नसल्याचे स्पष्टीकरण महापौरांनी दिले