पुणे-वर्गणी हा ऐच्छिक विषय आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात वर्गणीसाठी कोणी त्रास दिल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन सिंहगड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केले आहे. तसेच, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हांना आळा बसतो. शिवाय गुन्ह्यांच्या तपासात त्याची मोठी मदत होते. त्यामुळे सर्व दुकानदार व विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने धायरी येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी बैठकीत मांडली.
वर्गणीचा त्रास व्यापाऱ्यांना सर्वाधिक होत असतो. त्याविषयी पोलिसांनी व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी केली.