मुंबई, दि. २७ मार्च – तपास यंत्रणा मातोश्री म्हणजे आई की मातोश्री म्हणजे मातोश्री निवासस्थान याचा निश्चितपणे छडा लावतील. परंतु माझ्या माहितीप्रमाणे यशवंत जाधव यांच्या मातोश्री म्हणजे त्यांच्या आई या काही ५० लाखांचे घडयाळ वापरणाऱ्या नाहीत. किंवा २ कोटीचे गिफ्ट वापरणाऱ्या नाहीत, असे निश्चितच मला माहीत आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
आयकर विभागाला यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीला ५० लाखांचे घडयाळ आणि २ कोटी गिफ्ट अशी नोंद सापडली आहे. त्यासंदर्भात यशवंत जाधव यांनी मातोश्री म्हणजे माझी आई असे सांगितले आहे. त्यावर प्रसारमाध्यमांशी दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, डायरीतील मातोश्री म्हणजे नेमकी कोण, यासंदर्भात तपास यंत्रणा माहिती घेतील आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर यथावकाश ते येईल.