हा तर वाढदिवसानिमित्त राजकीय संधिसाधूपणा – श्रीनाथ भिमाले यांचा पलटवार;
शुभेच्छांचे फ्लेक्स लावले असतील तर काढून घेण्याचे समर्थकांना आवाहन
पुणे : शहरातील कित्येक एकरांवरील टेकड्या फोडणाऱ्या, मोठ्या प्रमाणावर झाडे तोडणाऱ्यांविरोधात भूमिका घेत आपण पुणेकरांना शुद्ध हवा मिळावी यासाठी प्राधान्याने काम करत आहोत. मात्र, अशा कृत्यांना संरक्षण देणाऱ्यांनी आपल्या चाहत्यांच्या प्रेमाचा आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सचा गैरफायदा घेत आपल्याला ‘विद्रूपीकरण पुरस्कार’ जाहीर केला आहे. हा तर वाढदिवसानिमित्त केला जाणारा राजकीय संधिसाधूपणा आहे, असा आरोप पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केला आहे.शहरातील अनधिकृत केबलचे जाळे हटविण्याची मोहीम आपण सुरू केली, तेव्हा आज आपली बदनामी करणारे कुठे होते? बेकायदा होर्डिंग्जविरोधात मोहीम सुरू केली, तेव्हा ही मंडळी कुठे होती,कोण होते ? असे सवाल उपस्थित करत भिमाले यांनी टीकाकारांवर पलटवार केला आहे.त्याचबरोबर आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जरूर द्याव्यात. मात्र, कृपया फ्लेक्स लावू नयेत. ज्यांनी प्रेमापोटी शुभेच्छांचे फलक लावले असतील, त्यांनी ते काढून घ्यावेत आणि विरोधकांना टीका करण्याची संधी देऊ नये, अशी विनंती भिमाले यांनी केली आहे.
शहराचे विद्रूपीकरण हटविताना किती जणांनी साथ दिली?
पुणे शहरातील नागरिकांच्या डोक्यावर असलेले अनधिकृत केबलचे जाळे हटविण्यासाठी आपण पुढाकार घेतला. शहराचे हे विद्रूपीकरण दूर करण्यासाठी किती जणांनी साथ दिली आणि किती जणांनी विरोध केला, याचाही विचार व्हायला हवा, असे भिमाले यांनी म्हटले आहे.
शहरातील टेकड्या, वृक्षसंपदा आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण काम करत असताना वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी लावलेल्या फ्लेक्सचा आधार घेऊन आपल्यावर टीका केली जात असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे
नेमका कशासाठी भिमाले यांचा पलटवार?
पुणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर आणि फ्लेक्सविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ या संकेतस्थळावर २४ नोव्हेंबर २०२६ रोजी उपरोधिक स्वरूपातील ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे, महापालिकेच्याच संकेतस्थळावर स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह पृथ्वीराज सुतार आणि सुनील पांडे यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.या पार्श्वभूमीवर भिमाले यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय संधिसाधूपणाचा आरोप केला आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर ‘साहेब’, ‘दादा’ आणि ‘भाऊ’
‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ अंतर्गत ‘माननीय’ या गटात पुढील नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
- साहेब – अख्ख्या शहरात फ्लेक्स : श्रीनाथ यशवंत भिमाले.
- दादा – प्रत्येक चौकात फ्लेक्स : पृथ्वीराज शशिकांत सुतार.
- भाऊ – गल्लीतला फ्लेक्स : सुनील नामदेव पांडे.
‘कृपया फ्लेक्स लावू नये. लावल्यास नाव इथे लावले जाईल’, असा संदेशही या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.
व्यावसायिक आस्थापनांनाही उपरोधिक पुरस्कार
‘ब्रँड्स’ या स्वतंत्र गटातही महापालिकेने तीन व्यावसायिक आस्थापनांची नावे प्रसिद्ध केली आहेत.
- फुकट जाहिरात प्रीमियम – Bramhapriya World School
- फुकट जाहिरात प्रो – RG’s Biryani Story
- फुकट जाहिरात – SHANTI SHIKHAR
‘जाहिरात फुकट, दंड मात्र रोख!’ असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
भिमालेंच्या आरोपांवर महापालिका प्रशासन काय बोलणार?
एकीकडे महापालिका प्रशासनाने शहर विद्रूपीकरणाविरोधात मोहीम उघडली आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्याच स्थायी समिती अध्यक्षांनी या पुरस्काराच्या निमित्ताने राजकीय संधिसाधूपणा होत असल्याचा आरोप केला आहे.

