पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण निरीक्षक व जेसीबी चालक यांच्यावर दगडफेक करत गंभीर मारहाण केल्याची घटना धानोरी येथे मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेत अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी व जेसीबी चालक सुभाष कांबळे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान पुणे महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने मंगळवारी सकाळी धानोरी रस्त्यावरील अतिक्रमण मोहीम सुरू होती. या कारवाईला स्थानिक नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी विरोध केला. महापालिकेला मोठी अतिक्रमणे दिसत नाहीत, गोरगरीब कष्टकरी व्यापारी व पथारी चालक व्यवसायिक यांच्यावर कायमच कारवाया केल्या जातातअसे आरोप करत संतप्त जमावाने दगडफेक केली. या कारवाईत नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी यांना जमावाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जेसीबी वर केलेल्या दगडफेकीत चालक सुभाष कांबळे ते जखमी झाले. याप्रकरणी महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सुरु आहे.
अतिक्रमण कारवाईत अडथळा आणणारे आणि हल्ला करणारे राजकीय लोक ? आयुक्त कारवाई करणार काय ?
या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान हा हल्ला एका माजी नगरसेविकेच्या पतीने केल्याचा आरोप सूत्रांकडून केला जात आहे.दरम्यान खरोखर हल्ल्याला प्रोत्साहन देणारे आणि अतिक्रमण कारवाईत अडथळा आणणारे लोक राजकीय असून त्यांच्यावर कारवाई जर आयुक्तांनी केली तर त्यांना निवडणुकीला उभे देखील राहता येणार नाही , यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार काय असा महापालिका कर्मचारी वर्तुळात सवाल उपस्थित होत असून , दुसरीकडे मात्र अशा कारवाईला विरोध करून एकूणच पब्लिक मध्ये नसले तरी अतिक्रमण करणारांच्या वर्तुळात हिरो बनू पाहत आहेत . असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या गोंधळानंतर अधिकारी आणि कर्मचारी भयभयीत झाले आहेत. अतिक्रमण विभागाचे पोलीस, सुरक्षारक्षक असताना सुद्धा अधिका-यांना मारहाण होते. तसेच जेसीबी फोडण्यात आली. अशा वेळी सुरक्षा यंत्रणा काय काम करत होती? पोलीस चौकी समोर हा प्रकार घडल्याने स्थानिक नागरिकांना गुंडागर्दी करण्यासाठी कुणाचा राजकीय वरदहस्त आहे असाही सवाल यावेळी उपस्थित केला आहे. अतिक्रमण कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना असे वारंवार नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामूळे त्याची दक्षता महापलिका आयुक्तानी घ्यावी अशी मागणी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली आहे.
शहरात सातत्याने रस्त्यावरील अतिक्रमणांवर जोरदार कारवाईची मोहीम सुरू आहे.
धानोरीत दुपारी दीडच्या सुमारास संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये पदपथावरील, पथारी व्यावसायिक विक्रेत्यांची अतिक्रमणे ताब्यात घेण्यापासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर इमारतींना लागून केलेल्या पत्राशेड व इतर तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणांवरही जेसीबी यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. ही कारवाई करत पालिकेचे पथक धानोरी गावठाण परिसरात पोहचले. याठिकाणी एका पत्राशेडवर कारवाई करत हे पत्राशेड जमीनदोस्त केले. यावेळी बघ्यांची व स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. याचदरम्यान स्थानिक नागरिक व पालिका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली. याचवेळी काही जणांनी जेसीबीवर दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पालिका अधिकारी जागेवरून दूर निघून गेले, तर जेसीबी चालकही जेसीबी सोडून निघून गेला.पालिकेच्या कारवाईत झालेली नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय जेसीबी यंत्राचा ताबा सोडणार नसल्याचा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला. दरम्यान, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पालिका पथकातील खाकी वर्दीतील सुरक्षा व इतर कर्मचारी जमावाच्या निदर्शनास पडले. त्यामुळे जमावाने या कर्मचाऱ्यांकडे धाव घेत अक्षरशः त्यांचा पाठलाग करत त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी या घटनेचे चित्रण करणाऱ्या दोन-तीन व्यक्तींचे मोबाईलही जमावातील व्यक्तींनी फोडले. दरम्यान, या घटनेबाबत पालिकेच्यावतीनं विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दुपारी साडेतीन नंतर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलीस पथक जेवायला
या कारवाईसाठी पालिकेच्या पथकाला पालिकेच्या पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते. मात्र जमावाकडून पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण होत असताना पोलीस अधिकारी व कर्मचारी जेवायला गेले होते. सर्व घटना घडून गेल्यानंतर पालिकेचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी काही एक बोलण्यास नकार दिला.