पुणे, ता. २७ – पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या वतीने या वर्षी २०० टन अमोनियम बायकार्बोनेटची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, ‘पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. शहरात घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या माध्यमांतून दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यातील सहा लाख गणेश मूर्ती या प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) बनविलेल्या असतात. पीओपी पाण्यात विरघळत नाही आणि त्यातील रासायनिक रंगांमुळे गणपती विसर्जनानंतर जलप्रदूषणात वाढ होते.’
रासने पुढे म्हणाले, ‘महापालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून गणेश विसर्जनासाठी हौद आणि टाक्यांची व्यवस्था केली जाते. पीओपीच्या मूर्त्यांच्या विसर्जनाबाबत राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) तज्ज्ञांशी विचार विनियम केला असता अमोनिअम बायकार्बोनेटमध्ये पीओपी विरघळते असे संशोधन नोंदविण्यात आले. त्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कृषी विभागाने प्रमाणित केले होते. त्यानुसार गेल्या वर्षी १५० टन अमोनिअम बायकार्बोनेटची खरेदी करण्यात आली होती.’
रासने पुढे म्हणाले, ‘या वर्षी महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट २३ गावे आणि नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेता राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड, चेंबूर यांच्याकडून २०० टन अमोनिअम बायकार्बोनेट खरेदी करण्यासाठी करार करण्यास आज स्थायी समितीने मान्यता दिली. पीओपीच्या मूर्तीच्या वजनाइतके अमोनिअम बायकार्बोनेट पाण्यात मिसळून पर्यावरणपूरक पद्धतीने या मूर्त्यांचे विसर्जन करता येते. या मिश्रणाचा खत म्हणून उपयोग होतो. गणेशोत्सवाचे पावित्र्य राखत मूर्त्यांचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.’