पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’चा समारोप शुक्रवारी सायंकाळी झाला. संगीतापासून विविध कलांचे सादरीकरण, ऐतिहासिक पुण्याची माहिती, नामवंतांशी संवाद अशी सांस्कृतिक मेजवानी असणारा हा ‘फेस्ट’ दिनांक २५ ते ३० डिसेंबर २०१६ दरम्यान ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा’ येथे आयोजित केला होता.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते या ‘आर्ट प्लाझा फेस्ट’चे उद्घाटन झाले होते. यावेळी महापौर प्रशांत जगताप, हायटेक टेक्सटाईल पार्क (बारामती) च्या अध्यक्ष सुनेत्रा पवार, शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘परदेशात नदीकिनारी, ब्रीजवर अनेक कलाकार आपली कला सादर करीत असतात. त्याच धर्तीवर ज्या कलाकारांना आपली कला लोकांसमोर सादर करायची इच्छा होती त्यांच्यासाठी हा ‘आर्ट प्लाझा फेस्ट’ आयोजित करण्यात आला होता. ‘स्मार्ट सिटी’ पेक्षा ‘हॅप्पी सिटी’ असण्यासाठी अशाप्रकारच्या ‘आर्ट प्लाझा फेस्ट’चे महत्व आणि उपयुक्तता अधिक आहे, असे खा.अॅड.वंदना चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले.
लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी या ‘आर्ट प्लाझा फेस्ट’ मध्ये आनंद घेतला. या कार्यक्रमाला नागरिकांनी खूप उत्तम प्रतिसाद दिला. बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्टमध्ये संगीत, कला, सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची मेजवानी होती. यामुळे पुणेकर रसिकांनी पुण्याची संस्कृती, पुण्यासंदर्भात आकर्षक माहितीचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाचे संयोजन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागप्रमुख सनी मानकर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रमुख मनाली भिलारे यांनी केले होते. तसेच संजीवनी जोगळेकर आणि अक्षया बोरकर यांनी सहकार्य केले.
आर्ट प्लाझा फेस्टमध्ये ‘चिंटू’ या गाजलेल्या चित्र मालिकेचे जनक चारुहास पंडित यांनी नागरिकांशी संवाद साधला. ड्रम्स, अकॉर्डीयन, व्हॉयोलीन, गिटार वादन, सितार व बासरी वादन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. राहुल चक्रवर्ती यांचे वॉटर कलर पेंटिंग लक्षवेधी होते. तबला- पखवाज जुगलबंदी, सुफी संगीताचा रसिकांनी आस्वाद घेतला. दीपाली पतवडकर यांनी स्टीपलिंग आर्ट सादर केले. मेंदी, ‘सिग्नेचर वॉल’, टॅटू, ‘फेस पेंटीग’, ‘फाईन आर्ट’ यांचा देखील समावेश होता. तसेच अभिजित धोंडफळे यांनी शिल्पकला सादर केली व मनीषा कुलकर्णी यांनी पेपर आर्टचे प्रात्यक्षिक दाखविले.
बंडगार्डनच्या ऐतिहासिक पुलाच्या कलात्मक नूतनीकरणासाठी, आर्ट प्लाझा निर्मितीसाठी अॅड. वंदना चव्हाण यांनी खासदार निधीतून 50 लाख दिले आहेत. या पुलाला हेरिटेज दर्जा आहे.
पुणे हे ऐतिहासिक शहर, सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्याबरोबरच आय टी-ऑटो हब व युवकांचे शहर म्हणून म्हणूनही पुणे नावारूपाला आले आहे. शहरवासीयांना तसेच इतर राज्यातून आपल्या शहराला भेट देणार्यांना येथील ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास व त्याची भव्यता, वास्तुकला बघायला, ऐकायला मिळावे यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न केले आहेत व त्या वास्तू नागरिकांना खुल्या केल्या आहेत.
पुण्यातील या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक वास्तू म्हणजे ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा’. मुळा मुठेच्या संगमानंतर नदीवर असलेल्या ऐतिहासिक पुलावर कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या आर्ट प्लाझाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी तयार केलेल्या विविध सुविधांची माहिती पुणेकरांना व्हावी व या वास्तूचा आनंद लुटता यावा यासाठी ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’चे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.