मुंबई-ठाण्यातील विवियन माॅलच्या चित्रपटगृहातील धडगूस घालून प्रेक्षकांना मारहाण करीत ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यांची वर्तकनगर पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.दरम्यान वर्तकनगर पोलिस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी जमले असून सरकारविरोधात ते घोषणाबाजी करीत आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचा ते निषेध करीत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आणि सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी 11 नोव्हेंबरला रात्री दहा वाजताचा हर हर महादेव चित्रपटाचा शो स्वःत बंद पाडला. त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते विवियन माॅलच्या चित्रपटगृहात चालून गेले व त्यांनी चित्रपट पाहू नका असे सांगत प्रेक्षकांना बाहेर काढले. यावेळी प्रेक्षकांना मारहाणही झाली होती.
या संदर्भात आव्हाड यांनी सांगितले कि,’आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल.हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.