पुणे- राष्ट्रवादी महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी पुण्याच्या रुपाली चाकणकर यांची चित्रा वाघ यांच्या जागी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी शुक्रवारी महिला अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. आज शनिवारी तातडीने यापदावर नियुक्ती करण्यात आली .खडकवासला विधानसभा मतदार संघातून चाकणकर या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे पाहण्यात येते आहे. त्यांची निवड होताच शरद पवार यांनीही त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छ्या दिल्या आहेत .
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाशी सुरुवातीपासून एकनिष्ठ राहणारे अनेक नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या तडफदार महिला नेत्या म्हणून ओळख असलेल्या चित्रा वाघ यांनीदेखील पक्षाला राम राम ठोकला आहे. चित्रा वाघ यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे राष्ट्रवादीला सोडल्याचं बोललं जातं आहे. बराच काळ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. चित्रा वाघ यांनी पक्ष सोडणं हा खूप मोठा धक्का मानला जात असतानाच रुपाली चाकणकर यांची महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांनी आतापर्यंत महिला आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक संघटनात्मक पदांवर त्यांनी काम केलं आहे. सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.