सिक्कीममधल्या सीमावर्ती भागात तैनात जवानांसोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी साजरी केली दिवाळी

Date:

अतिशय प्रतिकूल उंचावर भौगोलिक परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्य, व्यावसायिक कौशल्य आणि समर्पणाचे केले कौतुक

शेराथांग युद्धस्मारक इथे संरक्षणमंत्र्यांकडून शहीद जवानांना आदरांजली, बाबा हरभजन सिंह स्मारक इथेही केले अभिवादन

नवी दिल्ली-

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 8 नोव्हेंबर 2026 रोजी सिक्कीममधल्या सीमावर्ती भागात तैनात असलेल्या त्रिशक्ती कोअरच्या (33 कोअर) जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ, पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल व्ही. एम. बी. कृष्णन, 33 कोअरचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल मनराज सिंह मान आणि भारतीय लष्कराचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेराथांग इथे जवानांशी संवाद साधताना राजनाथ सिंह यांनी जवानांना दिवाळीतील सर्वांत तेजस्वी दिवे असे संबोधले. सीमांवर त्यांची असलेली निष्ठा आणि दक्षता संपूर्ण देशाला सुरक्षिततेची भावना देत असल्याचे त्यांनी सांगितले.  एखादा दिवा कोणाचेही लक्ष वेधून न घेता अंधार दूर करतो, त्याचप्रमाणे जवान शांतपणे आपले कर्तव्य बजावतात. त्यामुळे देशाच्या नागरिकांना शांततेत व सुरक्षित वातावरणात सण साजरे करता येतात, असे ते यावेळी म्हणाले.

उंचावरच्या अतिशय प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी जवान दाखवत असलेले व्यावसायिक कौशल्य, उच्च मनोबल आणि अढळ बांधिलकी यांचे संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केले. मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी याच उत्साहाने आणि समर्पणाने कार्यरत राहण्याचे आवाहन त्यांनी जवानांना केले. कुटुंबीयांपासून दूर राहून, वैयक्तिक सुख आणि सणसमारंभांपेक्षा देशसेवेला प्राधान्य देणाऱ्या जवानांच्या त्यागाचीही त्यांनी दखल घेतली.

शिस्त आणि धैर्य यांचे महत्त्व अधोरेखित करताना , तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी जवानांमध्ये हे गुण नसतील तर त्या तंत्रज्ञानाचा फारसा उपयोग होणार नाही असे राजनाथ सिंह म्हणाले. जवानांचे वर्तन, गणवेश, भाषा आणि संयम यांतून स्थानिक समुदायांमध्ये लष्कराची प्रतिमा घडत असते, असे त्यांनी नमूद केले. शेराथांग आणि आसपासच्या परिसरातले स्थानिक नागरिक आणि भारतीय लष्कर यांच्यातल्या विश्वासाचे आणि सद्भावनेचे नाते अधिक दृढ करण्याचे आवाहन त्यांनी जवानांना केले.

संरक्षणमंत्र्यांनी शेराथांग युद्धस्मारक इथे देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या जवानांना आदरांजली अर्पण केली. तसेच, बाबा हरभजन सिंह स्मारकाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. या प्रदेशातल्या लष्करी आणि नागरी परंपरांमध्ये त्यांच्या वारशाला आजही विशेष स्थान आहे.

अशी स्मारके केवळ भूतकाळातल्या घटना आणि बलिदानांचे स्मरण करून देत नाहीत, तर ती सामूहिक स्मृती घडवतात आणि राष्ट्रीय जाणीव व अभिमान जागृत करतात असे शेराथांग युद्धस्मारकाचे महत्त्व अधोरेखित करताना राजनाथ सिंह म्हणाले. या स्मारकात सन्मानित करण्यात आलेल्या जवानांमध्ये नागालँड, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान आणि आसाम यांसह देशाच्या विविध भागांतल्या जवानांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेश, भाषा किंवा समुदाय कोणताही असला, तरी नागरिकांच्या रक्षणासाठी या शूर जवानांनी आपले प्राण अर्पण केले, असे ते म्हणाले. एकता आणि निःस्वार्थ सेवेची ही भावना हाच भारताचा आत्मा आणि जीवनमूल्य असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतात प्रत्येक नागरिक आपल्या देशबांधवांना एकाच कुटुंबाचा सदस्य मानतो, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांच्या सन्मानार्थ नवी दिल्ली इथे राष्ट्रीय युद्धस्मारकाची उभारणी केल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.  राष्ट्रीय युद्धस्मारकावर सुमारे 26,000 शहीद जवानांची नावे त्यांच्या अतुलनीय शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी सुवर्णाक्षरांत कोरली आहेत. या स्मारकावर एखाद्या शहीद जवानाचे नाव पाहिल्यावर त्याच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना तसेच त्याच्या मूळ गावातल्या आणि प्रदेशातल्या नागरिकांना अभिमानाची तीव्र भावना जाणवते. ही स्मारके वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरतात, असे त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

३८ हजार २३३ दिव्यांनी उजळला शनिवार वाडा अन् ‘वन्दे मातरम्’चा होत राहिला जयघोष

पुणे, दि. ७ नोव्हेंबर : देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि भारतीय...

अयोध्येत ३० लाख दिव्यांचा महासागर! दीपोत्सव २०२६ ने उजळली रामनगरी; सरयूच्या ५६ घाटांवर नेत्रदीपक रोषणाई

रामजन्मभूमी मंदिरासह संपूर्ण अयोध्या प्रकाशमय; २१०० ड्रोनद्वारे रामायणातील प्रसंगांचे...

लाल महाल दीपोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा जागर!

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिवाळीची...