विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन
पुणे, : घरगुती व सार्वजनिक वीजयंत्रणेच्या विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन व जनजागरण करण्यासाठी जिल्ह्यात दि. 11 ते 17 जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 11) सकाळी शनिवारवाडा येथील उद्घाटन कार्यक्रमानंतर विद्युत सुरक्षा रॅलीने सप्ताहातील विविध उपक्रमांना सुरवात होणार आहे.
दरम्यान, राज्यभरातील विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप पुणे येथे मंगळवारी (दि. 17) होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उर्जामंत्री मा. ना. श्री. चंद्गशेखर बावनकुळे व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गिरीश बापट यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विद्युत नियमांचे पालन व्हावे तसेच घरगुती किंवा सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सतर्क व सावधगिरी बाळगण्याबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून विद्युत सुरक्षा सप्ताहाचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील या सप्ताहात विद्युत निरीक्षक विभाग, महावितरण व महापारेषण कंपनी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अग्निशामक दल, औद्योगिक विकास महामंडळ, लिफ्ट कॉन्ट्रॅक्टर असोशिएशन व विविध संघटना संयुक्तपणे सक्रीय सहभागी होणार आहेत.
विद्युत सुरक्षा सप्ताहात येत्या दि. 11 ते 17 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात प्रबोधनात्मक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सिनेमागृहांत विद्युत सुरक्षेच्या ध्वनिचित्रफितींचे प्रसारण होईल. पुणे आकाशवाणीवरून विविध कार्यक्रम व मुलाखतींद्वारे विद्युत सुरक्षेची माहिती दिली जाईल. पोस्टर्स, हॅण्डबिल्स, माहितीपुस्तिका, स्टिकर्स आदींद्वारे प्रबोधनात्मक माहिती देण्यात येईल. महावितरण व महापारेषणचे तांत्रिक कर्मचारी, विविध औद्योगिक कंपन्यांतील कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये पथनाट्य सादरीकरणातून आणि निबंध, चित्र व घोषवाक्य स्पर्धांद्वारे विद्युत सुरक्षेबाबत जनजागरण करण्यात येणार आहे. याशिवाय विद्युत सुरक्षेचे प्रशिक्षण वग, कार्यशाळा व व्याख्यांनाचे आयोजन करण्यात आले आहे.