पुणे,: ‘नानी’ व ‘इनक्रेडीबल फादर’ या दोन पुस्तकांमधून लेखक डॉ. मुरहरी केळे यांनी आईवडिलांचा सांसारिक व पारमार्थिक समृद्धीचा प्रातिनिधिक वारसा अधिक समृद्ध केला आहे. अशा राबणार्या कष्टकरी माणसांची चरित्रे समाजाला प्रेरणा देणारी आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
कोथरूडमधील अभिनव इंग्रजी विद्यालयात डॉ. मुरहरी केळे लिखित ‘नानी’ व ‘इनक्रेडीबल फादर’ या चरित्रात्मक पुस्तकांचे प्रकाशन पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील व जलसंधारण मंत्री ना. प्रा. श्री. राम शिंदे यांच्याहस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. मोरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लेखक डॉ. मुरहरी केळे, समिक्षक डॉ. महेश खरात व डॉ. आसावरी जोशी-देशपांडे, संस्कृती प्रकाशनच्या (ठाणे) सौ. मनीषा केळे, अनुवादक डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी उपस्थित होते.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मोरे म्हणाले, ‘नानी’मध्ये आईचा सांसारिक परमार्थ व ‘इनक्रेडीबल फादर’मध्ये वडिल सोपानकाका महाराज यांचा पारमार्थिक संसार डॉ. केळे यांच्या पुस्तकातून साकारला आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री ना. श्री. राम शिंदे म्हणाले, विद्युत अभियंता म्हणून डॉ. केळे यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. पण त्यांनी आयुष्याकडे मागे वळून पाहताना ‘नानी’ म्हणजे आईच्या चरित्रात्मक पुस्तकांतून ग्रामीण व सामाजिक जीवनातील स्त्रीरूपं उलगडून दाखवलेले आहेत. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, आईवडिलांमध्ये असलेले देवत्व डॉ. केळे यांनी अत्यंत ह्रदयस्पर्शी लेखनातून व्यक्त केले आहे. प्रत्येकाने आपल्या आईवडिलांमध्ये देवत्व पाहायला शिकले पाहिजे व त्यांच्या संस्कारातून आपले आयुष्य साकारले पाहिजे. लेखक डॉ. मुरहरी केळे म्हणाले, अनंताच्या प्रवासाला गेलेल्या आईवडिलांच्या आठवणीत त्यांची विविध रुपं उलगडायला लागली व त्यातून या दोन्ही पुस्तकांचे लेखन झाले आहे.
कार्यक्रमात समीक्षक डॉ. महेश खरात व डॉ. आसावरी जोशी-देशपांडे, अनुवादक डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. समाजशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने डॉ. केळे यांची ही दोन्ही पुस्तके मराठी साहित्यात महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी श्री. उद्धव कानडे यांनी केले तर श्री. मनोहर कोलते यांनी आभार मानले.