पुणे : महावितरणच्या वीजविषयक ग्राहकसेवा ‘एसएमएस’द्वारे मिळविण्यासाठी पुणे परिमंडलातील 7,83,548 वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे.
दरम्यान, महावितरणने केलेल्या आवाहनानुसार वीजग्राहकांकडून मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत पुणे परिमंडलात सुमारे 43 हजार 800 वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे.
वीजग्राहकांना वीजबिलासोबतच वीजपुरवठा बंद असल्याच्या कालावधीची माहिती ‘एसएमएस’ पाठविण्यात येणार आहे. ही माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी वीजग्राहकांनी महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महावितरणकडून वीजग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा इमेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना स्वतःचा इमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी 9225592255 क्रमांकाला (बारा अंकी ग्राहक क्रमांक)(वीजग्राहकाचा इमेल) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास इमेल आयडीची नोंदणी होईल. तसेच नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे.
याशिवाय महावितरणच्या 24X7 सुरु असणार्या कॉल सेंटरचे 18002003435 आणि 18002333435 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून कोणत्याही कंपनीच्या मोबाईल किंवा दूरध्वनीद्वारे या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधता येतो. तसेच महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अॅपवर ही सोय उपलब्ध आहे.
वीजबिल भरणा केंद्गातही मोबाईल क्रमांक नोंदणीची सोय
‘एसएमएस’ द्वारे विविध सेवा मिळविण्यासाठी वीजग्राहकांना मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक, वेबसाईट, मोबाईल अॅप आदींची सोय उपलब्ध आहे. आता पुणे परिमंडलातील वीजबिल भरणा केंद्गातही मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.