पुणे– पुणे परिमंडलातील नवीन वीजजोडण्या तसेच सदोष वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत सिंगल व थ्री फेजचे 79 हजार 481 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन वीजमीटरचा तुटवडा असल्याबाबत कोणीही दिलेल्या माहितीवर वीजग्राहकांनी विश्वास ठेऊ नये तसेच नवीन वीजमीटर मिळत नसल्यास तक्रार करण्याचेही आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
पुणे परिमंडलातील विविध कार्यालयांत सध्या सिंगल फेजचे 42,703 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. यात गणेशखिंड मंडल अंतर्गत भोसरी, कोथरूड, पिंपरी व शिवाजीनगर विभागांमध्ये 22 हजार 800, रास्तापेठ मंडल अंतर्गत रास्तापेठ, पद्मावती, बंडगार्डन, नगररोड, पर्वती या पाच विभागांत 7 हजार 454 आणि पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागांत 12 हजार 370 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. यासोबतच तिनही मंडल कार्यालयांना प्रत्येकी 10 हजार असे एकूण 30 हजार नवीन वीजमीटर सोमवारी (दि. 12) देण्यात आले आहेत. त्यामुळे सिंगल फेजचे 72 हजार 703 नवीन वीजमीटर उपलब्ध झालेले आहेत. ही संख्या सद्यस्थितीत नवीन वीजजोडणी तसेच सदोष किंवा नादुरुस्त वीजमीटर बदलण्याच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक आहे. यासोबतच थ्री फेजचेही पुणे परिमंडलात 6 हजार 772 नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात गणेशखिंड मंडल – 3245, रास्तापेठ मंडल – 2784 व पुणे ग्रामीण मंडलमध्ये 1743 नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे सुद्धा सध्या असलेल्या पेडपेडींगपेक्षा कितीतरी जास्त आहेत.
पुणे परिमंडलातील सर्वच कार्यालयांना मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे नवीन वीजजोडणी देण्याची तसेच नादुरुस्त वीजमीटर सुद्धा तातडीने बदलण्यात यावेत व त्याची महावितरण अंतर्गत ईआरपीमध्येही (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) तात्काळ नोंद करण्याचे आदेश स्थानिक कार्यालयांना देण्यात आले आहेत. वीजमीटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून वीजग्राहकांची दिशाभूल केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास महावितरणच्या संबंधित कर्मचार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी याआधीच स्पष्ट केले आहे.
नवीन मीटर वीजजोडणीसाठी किंवा नादुरुस्त मीटरऐवजी बदलून मिळण्यास विलंब होत असल्यास महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयात ग्राहकांनी ताबडतोब संपर्क साधावा. याशिवाय मुंबई येथील विशेष मदत कक्षातील 022-26478989 किंवा 022-26478899 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत तसेच 24×7 सुरु असललेल्या 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.