राष्ट्रवादी काँग्रेसचा गुरुवारी पालिकेवर एक वर्ष अंधाराचे निषेध मोर्चा
पुणे :
भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील सत्तापूर्तीला येत्या गुरुवारी १५ मार्च रोजी वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीतील भाजप सरकारच्या कारभाराबद्दल असंतोष व्यक्त करण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने एक वर्ष अंधकाराचे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
लाल महाल ते महापालिका असा मोर्चाचा मार्ग असून, दुपारी ३ वाजता मोर्चास प्रारंभ होणार आहे. या मोर्च्यात नगरसेवक, सेल अध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
‘भाजप सरकारचे अंधारमय सत्तेचे एक वर्ष पूर्ण होत आहे. ही भाजप सत्तेची वर्षपूर्ती नसून, पुणेकरांच्या अंधकाराची वर्षपूर्ती आहे. पुणेकरांनी अत्यंत विश्वासाने विकासासाठी महापालिकेत भाजप ला सत्ता दिली; परंतु गुंडगिरी, निविदांमध्ये संगनमताच्या प्रकारे नातेवाईकांना विकास कामे देणे, भ्रष्टाचार यांचे प्रमाण वाढले आहे. याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा पक्षाच्या वतीने काढण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी सांगितले.