पुणे : पुणे परिमंडलात महावितरणने वीजचोरीविरोधात अचानकपणे राबविलेल्या दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत 477 ठिकाणी 1 कोटी 27 लाख 72 हजार रुपयांची वीजचोरी तसेच अनियमित वीजवापर उघडकिस आला आहे. यात संबंधित वीजग्राहकांना दंड, व्याज व वीजवापराचे देयके आकारण्यात आली असून 58 वीजग्राहकांकडून 10 लाख 39 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागातील राजगुरुनगर, मुळशी, मंचर विभागात दोन दिवसांची वीजचोरीविरोधी विशेष मोहिम नुकतीच राबविण्यात आली. या मोहिमेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती तसेच मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. महेंद्र दिवाकर, श्री. राजेंद्र पवार यांच्यासह अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
थेट वीजचोरी किंवा विजेचा अनियमित वापर सुरु असल्याची शक्यता ज्या ठिकाणी वीजबिलांच्या विश्लेषणात अधिक आढळून आली त्या परिसरात विशेष पथकांद्वारे धडक तपासणी करण्यात आली. या दोन दिवसांच्या कारवाईत 233 ठिकाणी 39 लाख 58 हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. यात राजगुरुनगर, मंचर व मुळशी विभागात सुरु असलेल्या 14 लाख 15 हजार रुपयांच्या 150 तर पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये 25 लाख 43 हजार रुपयांच्या 83 वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. या वीजचोरीप्रकरणी भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.
या मोहिमेतच 88 लाख 14 हजार रुपयांच्या विजेचा 244 ठिकाणी अनियमित वापर होत असल्याचे आढळून आले. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 212 ठिकाणी 84 लाख 20 हजार रुपयांच्या तर राजगुरुनगर, मुळशी व मंचर विभागात 32 ठिकाणी 3 लाख 93 हजार रुपयांच्या विजेचा अनियमित वापर आढळून आला. या प्रकरणी कलम 126 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
पुणे परिमंडलात विजचोरीविरोधात नियमित कारवाई सुरुच आहे. त्यासोबतच येत्या काही दिवसांत पुन्हा एकत्रितपणे व एकाच कालावधीत वीजचोरीविरोधात मोठी मोहीम घेण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.