पुणे, ता. २१ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) शाळांमध्ये २८ जूनपर्यंत योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये दहा हजारांहून अधिक विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक सहभागी झाले असल्याची माहिती कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी कळविली आहे.
या सप्ताहाच्या शुभारंभानिमित्त आज सर्व शाळांमध्ये ऑनलाइन व्याख्याने, परिसंवाद, अभिनव स्पर्धा, लघुपट, योगासने आणि सूर्यनमस्कारांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती.
न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत जागतिक योग साधनेतील तज्ज्ञ डॉ. संप्रसाद विनाद आणि डॉ. सुदाम काटे यांनी मार्गदर्शन केले. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये योगाचा इतिहास आणि महत्त्व या विषयावरील लघुपट दाखविण्यात आला.
डीईएस सेकंडरी स्कूलमध्ये योग शिक्षक किरण पाटील यांनी आदर्श जीवन पद्धती, योगासने, प्राणायाम, आहार या विषयावर उदृबोधक व्याख्यान दिले. डीईएस प्रायमरी स्कूलमध्ये संगीताच्या तालावर योगासनांची प्रात्यक्षिकांनी योग आणि संगीत दिन साजरा केला. मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात जगदीश वाघ यांनी योगाभ्यासावरील व्याख्यान आयोजित केले होते.
अहिल्यादेवी शाळेत योगासनांची प्रात्यक्षिके दाखविणारी ध्वनीचित्रफित ऑनलाइन दाखविण्यात आली. संगीत दिनानिमित्त जलतरंग वादक मिलिंद तुळणकर यांनी नादमय, रंजक, उद्बोध व्याखान दिले आणि प्रसिद्ध गाणी जलतरंगावर वाजवून दाखवली.
नवीन मराठी शाळेत नियमितपणे सहकुटुंब योगासने करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर कुटुंबियांचे अर्ज भरून घेण्यात आले. रानडे बालक मंदीरच्या विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर प्रात्यक्षिके सादर केली.
प्रा. कुलकर्णी म्हणाले, ‘योगासने घरच्या घरी करता येतात. त्यासाठी कोणत्याही साधनांची गरज लागत नाही. योगासनांमुळे सकारात्मकता, उत्साह वाढतो शिवाय मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखले जाते. देण्याची गरज असते. म्हणूनच २८ जूनपर्यंत सुरू राहणार्या योग सप्ताहात डीईएसच्या वतीने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना ऑनलाइन शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे.’