तुळशीबाग श्रीराम मंदिरात राम जन्म सोहळा थाटात ; श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे आयोजन ; रामनवमी उत्सवाचे यंदा २६२ वे वर्ष
पुणे :बाळा जो जो रे… दशरथ नंदना… बाळा जो जो रे… चे स्वर आणि श्रीराम नामाच्या अखंड जयघोषाने पेशवेकालीन तुळशीबाग श्रीराम मंदिरात निनादले. पुणेरी पगडी आणि पारंपरिक वेशात सहभागी रामभक्तांच्या गर्दीने फुललेल्या मंदिरात २६२ व्या वर्षी श्रीरामनवमी उत्सव थाटात साजरा झाला. दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी मंदिराच्या सभामंडपात लावलेला पाळणा हलला आणि रामनामाचा एकच नामघोष झाला. भक्तांनी फुलांची उधळण करीत श्रीरामजन्म सोहळा प्रत्यक्षपणे अनुभवला.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग येथील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कीर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले, विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार यावेळी उपस्थित होता.
मंदिरात सकाळी पवमान अभिषेकाने सोहळ्याला प्रारंभ झाला. मंदिरात आकर्षक पुष्पसजावट व विविधरंगी लाईटची विद्युतरोषणाई करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या परिसरात श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. कीर्तन व पाळणा म्हणजेच रामजन्म सोहळा झाल्यानंतर पागोट्याचा प्रसाद घेण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
शनिवार, दिनांक १ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांचे लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. गुरुवार, दिनांक ६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ वाजता ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.विकासबुवा दिग्रसकर यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. रविवारी, दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने श्रीरामजन्मोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे.