रामेश्वर (रूई) येथे प्रभू श्रीरामचंद्र जन्मसोहळा संपन्न
पुणे, दि.३०:“ मानवता तीर्थ म्हणून उदयास आलेल्या रामेश्वर (रूई) येथे रामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेली रथयात्रा अलौकिक व अद्वितीय आहे. गावातील एकता व एकोपा पाहता डॉ. विश्वनाथ कराड यांचे कार्य शांती दूताचे आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांच्या वचानांचे पालन करून मानव कल्याणासाठी ते अखंड कार्यरत आहे.” असे विचार काशी बनारस येथील ज्येष्ठ तत्त्वज्ञ, विचारवंत डॉ. योगेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व रामेश्वर (रूई) ग्रामस्थांच्या वतीने मानवतातीर्थ म्हणून साकार झालेल्या रामेश्वर (रूई) येथे प्रभू श्रीरामचंद्र जन्मसोहळा व श्रीराम रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी युनेस्को अध्यासन प्रमुख व अध्यक्ष विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
या प्रसंगी प्रथितयश लेखिका, कवी व विचारवंत डॉ. पुष्पिता अवस्थी या सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून होत्या.
तसेच, माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक व आमदार रमेशअप्पा कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, श्री. तुळशीराम दा. कराड, श्री. काशीराम दा. कराड, डॉ. सुचित्रा कराड-नागरे, डॉ. हनुमंत तु. कराड, राजेश का कराड व कमाल राजेखाँ पटेल हे उपस्थित होते.
डॉ. योगेंद्र मिश्रा म्हणाले,“ मानवता तीर्थ रामेश्वर रुई हे गाव आता विश्वशांतीचे माहेर घर म्हणून ओळखले जाईल. डॉ. कराड यांनी ही भूमी मानवतेच्या धर्म विचारांनी घडविली आहे. या अलैकिक कार्याचे स्वरूप पाहता येथील माती काशी येथे घेऊन जात आहे. भगवान श्रीरामांनी जे कार्य केले आहे त्याच कार्याचा आदर्श घेऊन ते जीवनाची वाटचाल करीत आहेत.”
डॉ. पुष्पिता अवस्थी म्हणाल्या,“ भगवान श्री राम यांची प्रचिती हदयात तेवत राहण्यासाठी रामनवमी साजरी केली जाते. श्री राम यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून डॉ. विश्वनाथ कराड हे संपूर्ण विश्वात शांती स्थापनेसाठी कार्य करीत आहेत.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी बनारसला जे स्वरूप दिले आहे. त्याला ज्ञानाचे रूप देण्यासाठी एमआयटीने ९वीं जागतिक धर्म परिषदेचे काशी येथे आयोजन केले होते. काशी नगरी व रामेश्वर (रूई) हे वेद विद्या व संस्कृतचे माहेर घर आहे. आळंदी देहू पंढरपूर हे जशी ज्ञान पंढरी आहे तसेच बद्रिनाथ ही देव भूमी असून माणा गाव येथे मंदीर निर्मिती केली आहे.”
रमेशअप्पा कराड म्हणाले, “डॉ. विश्वनाथ कराड यांनी रामेश्वर रूई या गावाचा संपूर्ण विकास केला आहे. येथे सर्व धर्मांचे धार्मिक स्थळ बांधून सर्व धर्म समभावाला साक्षात उतरविले आहे. मानवता तीर्थ काय असते त्यांनी आपल्या कार्यातून दाखविले आहे. त्याच प्रमाणे संपूर्ण देशातील वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक स्थळांचा कायापालट करीत आहेत. ”
ह.भ.प. श्री. बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर (बनकरंजा, ता. केज) यांनी काल्याच्या कीर्तनात सांगितले की, सध्या कलयुग सुरू आहे. या काळात श्री राम प्रभू यांच्या जीवनचरित्रावर चालण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. प्रभू श्रीराम हे सर्वगुणसंपन्न होते. मर्यादा पुरूषोत्तम श्री रामाचा गुण सर्वांनी अंगिकारावा हाच संदेश श्रीराम जन्म सोहळ्याच्या निमित्ताने आहे.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र जन्मसोहळ्याच्या निमित्ताने पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड यांनी श्रीराम मंदिरास अर्पण केलेल्या सुंदर, रेखीव आणि वैशिष्टपूर्ण अशा भारतीय संस्कृती दर्शन श्रीराम रथाची यात्रा श्रीराम मंदिरापासून सुरू झाली. ही रथयात्रा गौतम बुद्ध विहार येथे पोहचल्यानंतर बौद्ध बांधवांनी स्वागत केले. तसेच, जामा मस्जिद व जैनुद्दीन चिश्ती दर्ग्याजवळ मुस्लिम बांधवांनीही तिचे स्वागत केले.
संत गोपाळबुवा मंदिर येथून निघालेल्या रथयात्रेने ग्रामप्रदक्षिणा करून राम मंदिर येथे समारोप झाला. रामेश्वरच्या रथयात्रेसाठी पंचक्रोशीतील महिला व पुरूष भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. तसेच, मिरवणूकीच्या दरम्यान शालेय विद्यार्थिनी कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.
सूत्रसंचालन हभप शालिकराम खंदारे महाराज यांनी केले. राजेश कराड यांनी आभार मानले.
मानव कल्याणासाठी मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांच्या वचनांचे पालन करावे-विचारवंत डॉ. योगेंद्र मिश्रा
Date: