पुणे-
वारजे भागातील करण प्लाझा येथील रोझरी शाळेजवळील बिअर शॉपीमधून बिअर चे २ बॉक्सेस जबरदस्तीने घेऊन जाणाऱ्या आणि पैसे कोणाला मागतोस ,आम्ही इथले भाई आहोत अशी दमदाटी करत लुट करणाऱ्या भैय्या उर्फ लक्ष्मण शेंडगे याच्यासह चौघांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यान्वये शनिवारी कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काअंतर्गत सदरची 19 वी कारवाई आहे.
लक्ष्मण उर्फ भैय्या येडबा शेंडगे (23), स्वामी उर्फ काळू ज्ञानेश्वर खवळे (22), आदित्य गणेश मंडलीक (20) आणि अनिल बापु बनसोडे (30, सर्व रा. म्हाडा वसाहत, वारजे माळवाडी,पुणे) यां आरोपी विरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपी भैय्या उर्फ लक्ष्मण शेंडगे हा टोळीप्रमुख असून त्याने काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून संघटीत टोळी तयार केली आहे.
त्यांच्या टोळीने खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत करणे आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. आरोपींनी संघटित दहशतीच्या मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता गुन्हे केल्याचे दिसून आल्याने तसेच त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने वारजे पोलिसांनी आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम तीन (1), तीन (2),तीन (4) प्रमाणे कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला.
वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी.एस. हाके, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे यांनी सहाय्यक आयुक्त रूक्मिणी गलांडे आणि पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्या मार्फतीने पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे आरोपींविरूध्द मोक्का कारवाई होण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. तो प्रस्ताव पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे सादर झाल्यानंतर त्यांनी संबंधित प्रस्ताव मंजूर केला आहे.