महापालिकेचा कठोर पवित्रा; दुकानदार, फेरीवाले आणि मंडई व्यावसायिकांसाठी स्वच्छतेचे नियम बंधनकारक
पुणे : शहरातील सार्वजनिक स्वच्छतेबाबत पुणे महानगरपालिका प्रशासनाने कठोर पवित्रा घेतला आहे. अतिक्रमणांविरोधातील कारवाईपाठोपाठ आता अस्वच्छता करणाऱ्या दुकानदार, फेरीवाले आणि मंडई व्यावसायिकांवरही महापालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छतेच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असून, पाचव्यांदा नियम मोडल्यास दुकान सील अथवा फेरीवाला परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील दुकानदार, व्यावसायिक आस्थापना, फेरीवाले आणि मंडई व्यावसायिकांसाठी स्वच्छतेविषयक नियम लागू करण्यात आले आहेत.
फेरीवाले आणि मंडई व्यावसायिकांसाठी नियम
- व्यवसायाची जागा आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे बंधनकारक.
- ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करण्यासाठी दोन स्वतंत्र कचराकुंड्या ठेवणे आवश्यक.
- सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर कचरा टाकण्यास मनाई.
दुकानदार आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी नियम
- प्रत्येक दुकानासमोर कचराकुंडी ठेवणे बंधनकारक.
- दुकान आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक.
- रस्त्यावर अथवा पदपथावर कचरा टाकण्यास मनाई.
- कचरा केवळ महानगरपालिकेच्या कचरा संकलन वाहनाकडेच सुपूर्द करावा.
नियम मोडल्यास किती दंड?
- पहिल्यांदा उल्लंघन – १० हजार रुपये.
- दुसऱ्यांदा उल्लंघन – २० हजार रुपये.
- तिसऱ्यांदा उल्लंघन – ५० हजार रुपये.
- चौथ्यांदा उल्लंघन – एक लाख रुपये.
- पाचव्यांदा उल्लंघन – फेरीवाल्यांचा परवाना रद्द अथवा दुकान किंवा व्यावसायिक आस्थापना सील करण्याची कारवाई.
आता केवळ अतिक्रमणांवरच नव्हे, तर अस्वच्छतेवरही बडगा!
शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेची मोहीम सुरू असतानाच आता व्यावसायिकांकडून होणाऱ्या अस्वच्छतेलाही आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर नियम लागू केले आहेत.
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून, प्रत्येक व्यावसायिकाचीही आहे. त्यामुळे दुकानदार आणि फेरीवाल्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता राखावी, अन्यथा कठोर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

