रोहित पवार काँग्रेसमध्ये आले तर शंभर टक्के स्वागत; शरद पवारांना राज्यसभेची जागा देताना ‘इमोशनल ब्लॅकमेल’ झाल्याचाही आरोप
मुंबई : परिसीमन विधेयक आणि इंडिया आघाडीच्या बैठकीवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वावर जोरदार निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांना सत्तेत जाऊन मंत्री व्हायचे आहे. सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घरात बसूनच घेतला असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचे स्वागतच केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळेंच्या मनात सत्तेची आकांक्षा
सुप्रिया सुळे यांच्या राजकीय वाटचालीचा उल्लेख करताना वडेट्टीवार म्हणाले की, त्या भाजपच्या विमानातून प्रवास करत होत्या, पंतप्रधानांची वारंवार भेट घेत होत्या, तेव्हाच त्यांच्या मनात काय आहे, याचा अंदाज आला होता. त्यांना सत्तेत जाऊन मंत्रिपद मिळवायचे असल्याचा आरोप त्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय नेमका शरद पवारांचा आहे की सुप्रिया सुळे यांचा, असा प्रश्न विचारण्यात आला असता, आजही दोघे मिळूनच राजकीय निर्णय घेतात, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
रोहित पवारांसाठी काँग्रेसचे दरवाजे खुले?
आमदार रोहित पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यास काँग्रेस त्यांचे स्वागत करणार का, या प्रश्नावर वडेट्टीवार यांनी सकारात्मक भूमिका मांडली.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांसोबत राहणाऱ्या प्रत्येकाचे काँग्रेसमध्ये स्वागत आहे. रोहित पवार काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे शंभर टक्के स्वागत केले जाईल. पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व घेईल. वरिष्ठ नेतृत्वाने निर्णय घेतल्यास प्रदेश काँग्रेसचा त्याला विरोध असण्याचे कारण नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
राज्यसभेच्या जागेसाठी ‘इमोशनल ब्लॅकमेल’?
काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिळून ३६ आमदार असताना अवघे १० आमदार असलेल्या शरद पवार यांच्या पक्षाला राज्यसभेची जागा देण्याच्या निर्णयावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे ते आपल्यासोबत कायम राहतील, असा विश्वास निर्माण झाला होता. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्या वयाचा आणि राजकीय कारकिर्दीचा दाखला देत भावनिक दबाव निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला. त्यानंतर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
२०२९ मध्ये जनता हिशेब चुकता करेल!
इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांच्या बदलत्या भूमिकेवरही वडेट्टीवार यांनी टीका केली. सत्ता, स्वार्थ आणि पैशांसाठी राजकीय जवळीक साधली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आज कोणताही पक्ष कुठेही गेला, तरी २०२९ मध्ये जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. सत्ताधाऱ्यांच्या ‘गिन-गिन के बदला’ या भाषेचा वापर भविष्यात जनताच त्यांच्याविरोधात करेल, असेही वडेट्टीवार म्हणाले.
इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवार गट अनुपस्थित राहणार असल्याच्या चर्चेचाही त्यांनी उल्लेख केला. या घडामोडींमधून शरद पवार गटाची सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याची मानसिकता दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला.

