पुण्यात पोलिसांचे रात्री तीन तासांत ७२ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन!

Date:

कारागृहातून सुटलेल्या ७१४ आरोपींची पडताळणी; चार अवैध शस्त्रे जप्त, २५० किलो गांजासह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार बुधवारी रात्री १० ते गुरुवारी पहाटे १ वाजेपर्यंत शहरातील ७२ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेत सराईत गुन्हेगारांची पडताळणी, अवैध शस्त्रांविरोधात कारवाई, नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी करण्यात आली.

शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची ही व्यापक मोहीम महत्त्वाची ठरली आहे.

कारागृहातून सुटलेल्या आरोपींवर पोलिसांची नजर

कारागृहातून सुटलेल्या ७१४ आरोपींची पोलिसांनी पडताळणी केली असता त्यापैकी ३२४ आरोपी मिळून आले. याशिवाय विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना पाहिजे असलेल्या ४३ आरोपींची तसेच तडीपार कारवाई केलेल्या सात आरोपींचीही तपासणी करण्यात आली.

अंमली पदार्थ, लैंगिक अपराध, जबरी चोरी, सोनसाखळी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील अभिलेखावरील आरोपींचीही विशेष पडताळणी करण्यात आली.

कोम्बिंग ऑपरेशनची आकडेवारी

  • कोम्बिंग ऑपरेशन राबविलेली ठिकाणे – ७२
  • पाहिजे असलेल्या आरोपींची तपासणी – ४३
  • अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांतील अभिलेखावरील आरोपींची तपासणी – १४७; त्यापैकी ६६ मिळून आले.
  • पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यांतील आरोपींची तपासणी – १२१; त्यापैकी ४६ मिळून आले.
  • जबरी चोरी, सोनसाखळी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींची तपासणी – २१३; त्यापैकी ४५ मिळून आले.
  • तडीपार आरोपींची तपासणी – ७
  • कारागृहातून सुटलेल्या आरोपींची पडताळणी – ७१४; त्यापैकी ३२४ मिळून आले.
  • हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसची तपासणी – ३७५
  • मर्मस्थळे आणि संवेदनशील ठिकाणांची तपासणी – १७७

चार अवैध शस्त्रे जप्त; तिघांना अटक

अवैध शस्त्रांप्रकरणी पोलिसांनी तीन गुन्हे दाखल करून दोन आरोपींना अटक केली असून, तीन अवैध शस्त्रे जप्त केली आहेत.

याशिवाय अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली असून, एक अग्निशस्त्र जप्त करण्यात आले आहे.

अवैध धंद्यांविरोधात छापे टाकून दारूबंदी आणि जुगार प्रतिबंधक कायद्यांनुसार तीन कारवाया करण्यात आल्या.

२५० किलो गांजासह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक २ ने केलेल्या कारवाईत २५० किलो गांजासह दोन आरोपींना अटक करण्यात आली. गांजा, मोटार आणि मोबाईल असा एकूण एक कोटी ५१ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईचाही पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनच्या प्रसिद्धिपत्रकात समावेश केला आहे.

१,५१७ वाहनांची तपासणी; ११४ वाहनचालकांवर कारवाई

शहरात ४३ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. एकूण १,५१७ वाहनांची तपासणी करताना मोटार वाहन कायद्यानुसार ११४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

याशिवाय शहरात ६८ ठिकाणी फिक्स पॉइंट पेट्रोलिंग करण्यात आले. फरार आरोपींवर विशेष लक्ष केंद्रित करून शोधमोहीमही राबविण्यात आली.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण यंत्रणा मैदानात

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, मनोज पाटील, राजेश बनसोडे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गोहर हसन यांच्यासह सर्व परिमंडळांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

परिमंडळ क्रमांक १ ते ७ मधील पोलीस ठाणी, गुन्हे शाखा आणि वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या संयुक्त मोहिमेत सहभाग घेतला.

यापुढेही सातत्याने कोम्बिंग ऑपरेशन

या विशेष मोहिमेमुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास, अवैध शस्त्रे आणि अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यास तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास मदत झाल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यापुढेही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबवून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे पोलिसांची अंमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई; २५० किलो गांजासह दोघांना अटक!

लोणी काळभोर ते शिरूरपर्यंत संशयित वाहनाचा पाठलाग; दीड कोटींहून...

PSI परीक्षेच्या वयोमर्यादेत एक संधी द्यावी; विद्यार्थी प्रतिनिधींची मागणी

सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे PSI विद्यार्थ्यांचे निवेदन; मुख्यमंत्री...

पुणे गुन्हेगारांचे आणि बिल्डरांचे शहर बनत चाललेय; रवींद्र धंगेकरांचा पोलिसांवर गंभीर आरोप!

जमीन व्यवहारांत काही पोलीस अधिकारी, गुन्हेगार आणि बिल्डर लॉबीचे...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी बीव्हीजीचा पुढाकार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश...