६ कोटी २७ लाख रुपयांच्या वीजचोरीचा सुरक्षा व अंमलबजावणी विभागाकडून पर्दाफाश
मुंबई, दि. २० नोव्हेंबर २०२६: महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राज्यात अवघ्या तिनच दिवसात राबविलेल्या वीज चोरी मोहीमेत वीज चोरी व अनधिकृत वीज वापराची २५० प्रकरणे उघडकीस आली आहेत. या कारवाईत ६ कोटी २७ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला असून कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.
वीजचोरी आणि महसूल गळती रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील कोकण, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या प्रादेशिक परिक्षेत्रात सुरक्षा व अंमलबजावणी विभागाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये कोकण प्रादेशिक विभागात ५३, पुणे ७३, छत्रपती संभाजीनगर ५६ आणि नागपूर प्रादेशिक विभागात ६८ अशा एकूण २५० वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. वीज चोरी प्रकरणांचे मुल्यांकन झाले असून ६ कोटी २७ लाख रूपयांच्या वीज चोरीचे बिल संबंधित ग्राहकांना देण्यात आले आहे. वीज चोरीचे देयक व दंडाचा भरणा न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या मोहिमेत २४० ग्राहकांविरुद्ध विदयुत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तर कलम १२६ नुसार अनधिकृत वीज वापर प्रकरणी दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वीजचोरीचे देयक व दंडाच्या रकमेचा विहित मुदतीत भरणा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी फिर्याद देण्यात येणार आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंड व तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. सध्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी सुरू आहे. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र व सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक श्रीमती अपर्णा गिते यांनी केले आहे.

