नागपूर अधिवेशनात शेतकरी, दुष्काळ, महिला सुरक्षा आणि कारागृहांतील महिलांचे प्रश्न मांडणार; मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीवर कारवाईची मागणी
नागपूर दि. १९ : सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातील स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतच्या मांडणीवर उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. शायना एनसी यांनी पुस्तक फाडण्याचा प्रकार अनवधानाने घडल्याचे सांगून माफी मागितली असली, तरी या घटनेचा विपर्यास करून मूळ मुद्द्याला बगल देऊ नये, असेही त्या म्हणाल्या.
“सावरकरांबाबत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मांडलेल्या भूमिकेवर उबाठाचे मत काय, हे स्पष्ट झाले पाहिजे. काँग्रेसकडून सावरकरांचा अपमान झाला, त्याबद्दल माफी कधी मागणार, हा खरा प्रश्न आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. पुस्तकातील सावरकरांविषयीच्या उल्लेखांवरून सध्या राजकीय वाद सुरू आहे.
विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नागपूर येथे ७ ते १८ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला आहे. या अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, दुष्काळी परिस्थिती, हवामान बदलाचे परिणाम, विकासप्रकल्पांचा लाभ, महिलांवरील अत्याचार, शिक्षण आणि पेपरफुटीचे प्रश्न उपस्थित केले जातील, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. कारागृहांतील महिलांची परिस्थिती आणि नागपुरातील सायबर गुन्ह्यांबाबतही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागपूरचे अधिवेशन मुंबईला हलवण्याच्या मागणीबाबत त्या म्हणाल्या, “विदर्भातील प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा व्हावी, यासाठी नागपूर येथे अधिवेशन होणे महत्त्वाचे आहे. नागपूर करारानुसार अधिवेशन घेण्याची बांधिलकी राज्य सरकारची आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन नागपूरमध्येच होईल.” विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींच्या अखत्यारीत असल्याने त्यावर भाष्य करणे उचित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स कायद्याबाबत झालेल्या चर्चेत विविध भागधारकांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. रुग्णांना न्याय मिळावा, डॉक्टरांना कामासाठी स्पष्ट आणि योग्य नियम असावेत, तसेच बोगस डॉक्टरांना आळा बसावा, हा या कायद्यामागील उद्देश असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
दुष्काळातही मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून महिलांची सक्तीने कर्जवसुली होत असल्याच्या तक्रारींबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. “उपचार घेत असलेल्या महिलांकडेही वसुलीसाठी जाणे अमानुष आहे. अशा तक्रारींचा पाठपुरावा केंद्र आणि राज्य सरकारकडे करू. गरीब महिलांची फसवणूक किंवा छळ करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.
लातूरमधील टिपू सुलतान जयंती कार्यक्रमात अमित देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावरही डॉ. गोऱ्हे यांनी टीका केली. “टिपू सुलतानाचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याबाबतचे विधान त्यांनी मागे घ्यावे,” असे त्या म्हणाल्या. *

