धनत्रयोदशी निमित्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात साधकांकडून दीपप्रज्वलन
पुणे : एरंडवणा परिसरातील पटवर्धन बाग येथे गेल्या २१ वर्षांपासून सुरू असलेल्या ‘गार्डन ग्रुप प्राणायाम वर्गा’च्या वतीने धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे दीपप्रज्वलन करण्यात आले. विनामूल्य योगाभ्यासाच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य जपण्याचा आणि समाजात योगाची आवड निर्माण करण्याचा हा उपक्रम गेली २१ वर्षे सातत्याने सुरू आहे.
या वर्गाची स्थापना २००५ साली गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. स्वाती हिर्लेकर, स्वाती बहुलेकर, देव आणि दाणी या महिलांनी पतंजली योगपीठाचा अभ्यास पूर्ण करून समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना कोणताही भेदभाव न करता योगाभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने साधकांकडून कोणतेही शुल्क न घेता या वर्गाची सुरुवात केली. नागरिकांना निरोगी आणि आरोग्यदायी जीवन जगता यावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.
गेल्या २१ वर्षांपासून कोरोनाचा कालखंड वगळता हा वर्ग अखंडपणे सुरू आहे. वर्गाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्वाती हिर्लेकर आणि मालती दाणी आजही साधकांना योगाभ्यासाचे मार्गदर्शन करतात. तसेच अलका ठुबे, माधुरी आहेर आणि वैशाली ढगे यादेखील योगशिक्षिकेच्या भूमिकेतून साधकांना मार्गदर्शन करतात. सध्या मालती दाणी या वर्गाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
योगवर्गाच्या संस्थापक स्वाती हिर्लेकर यांचा यापूर्वी महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. त्यांच्या योगक्षेत्रातील योगदानाची ही विशेष दखल होती.
दररोज सकाळी ६ ते ७.३० या वेळेत भरणाऱ्या या वर्गात नियमितपणे २० ते २५ साधक सहभागी होतात. अंजली रोडे, दिलीप जाधव आणि प्रल्हाद पंढरपुरे यांच्यासह अनेक साधकांचा वर्गात उत्स्फूर्त सहभाग असतो.
योगाभ्यासासोबतच साधकांमध्ये सामाजिक एकोपा आणि आपुलकीची भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी वर्षातून दोन वेळा सहलींचे आयोजन केले जाते. दिवाळी, दसरा, गणेशोत्सव आणि गुरुपौर्णिमा हे सण उत्साहात साजरे केले जातात. तसेच साधकांचे वाढदिवसही आनंदाने साजरे करण्यात येतात.
दरवर्षी २१ जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या संख्येने आणि उत्साहात साजरा केला जातो. तसेच रथसप्तमीच्या निमित्ताने १०८ सूर्यनमस्कारांचा संकल्प अनेक साधक पूर्ण करतात. या उपक्रमांमुळे साधकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य आणि योगाभ्यासाबद्दलची आवड अधिक दृढ होत आहे.
नियमित आणि सातत्यपूर्ण योगाभ्यासामुळे अनेक साधक निरोगी जीवनाची वाटचाल करीत आहेत. कोणतेही शुल्क न घेता, प्रसिद्धीपेक्षा समाजाच्या आरोग्याला प्राधान्य देत सुरू असलेला ‘गार्डन ग्रुप प्राणायाम वर्ग’ हा एरंडवणा परिसरातील सामूहिक आरोग्य आणि सेवाभावाचा २१ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास ठरला आहे.
धनत्रयोदशी निमित्त आयोजित दीपप्रज्वलन कार्यक्रमातून साधकांनी आरोग्य, सकारात्मकता आणि एकतेचा संदेश दिला.


