पुणे-कल्याणी स्टील्स लिमिटेडने अमित कल्याणी यांची संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती २८ ऑक्टोबरपासून लागू झाली. ते कंपनीच्या विकासाच्या पुढील टप्प्याचे नेतृत्व करतील.
कंपनीचे संस्थापक डॉ. बाबासाहेब कल्याणी यांनी स्थापनेपासून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. आता कंपनीत नियोजनबद्ध नेतृत्वबदल करण्यात आला आहे. कल्याणी स्टील्स हा कल्याणी ग्रुपचा भाग आहे.
नियोजित अध्यक्ष अमित कल्याणी म्हणाले की, कंपनीची सुरुवात कठोर गुणवत्ता निकष पूर्ण करण्याच्या उद्देशाने झाली. अचूकतेवर भर देण्याची परंपरा ही कंपनीची ताकद आहे.
भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यावरणपूरक, प्रगत आणि जागतिक दर्जाच्या सामग्रीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनी ग्रीन स्टील, प्रगत सामग्री आणि डिजिटल तंत्रज्ञानावर भर देईल. तसेच, महत्त्वाच्या उद्योगक्षेत्रांत आणि जागतिक बाजारपेठांमध्ये व्यवसाय वाढवेल.
डॉ. बाबासाहेब कल्याणी म्हणाले की, काळानुसार नेतृत्वात बदल होत राहिल्यास संस्था दीर्घकाळ टिकतात. अमित यांनी कंपनीच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतला असून, कंपनीच्या विकासाच्या धोरणाला त्यांची मदत झाली आहे.
अमित कल्याणी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ कल्याणी ग्रुपच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. भारत फोर्ज लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी ग्रुपचा व्यवसाय एअरोस्पेस, संरक्षण, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत सामग्री या क्षेत्रांत वाढवला.
कल्याणी स्टील्सचे व्यवस्थापकीय संचालक आर. के. गोयल यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. कंपनीचे विकासधोरण ठरवण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात त्यांचा वाटा आहे.
सुरुवातीला भारत फोर्जला स्टील पुरवणारी कंपनी म्हणून कल्याणी स्टील्सची सुरुवात झाली. आता कंपनी भारतातील आणि जागतिक बाजारपेठांतील वाहन उद्योग, औद्योगिक क्षेत्र आणि महत्त्वाच्या उद्योगांना स्टील पुरवते.
कंपनीचे उत्पन्न १९८४ मध्ये १९.२ कोटी रुपये होते. २०२५-२६ या आर्थिक वर्षात ते १,९०२ कोटी रुपये झाले. डॉ. कल्याणी यापुढेही संचालक मंडळाला मार्गदर्शन करत राहतील.

