दोन आठवडे झाले पार, अहवाल द्या सरकार! ध्वनीप्रदूषणाच्या कारवाईचा हिशोब मागत बालगंधर्व चौकात आंदोलन

Date:

पुणे : गणेशोत्सव संपून दोन आठवडे उलटूनही ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी, नोंदी आणि कारवाईचा सविस्तर अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही, असा आरोप करत लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने आज बालगंधर्व चौकात आंदोलन केले. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला पुन्हा रस्त्यांवरील मंडप, लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशांच्या आवाजाचा प्रश्न पुढे आल्याने ध्वनीप्रदूषणविरोधी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

“दोन आठवडे झाले पार, अहवाल द्या सरकार!”, “तक्रारी झाल्या हजार, कारवाईचा कुठे समाचार?” तसेच “पोलीस, पालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ — जवाब दो!” अशा घोषणांद्वारे आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

गणेश विसर्जन मिरवणूक २६ सप्टेंबरला संध्याकाळी संपली. त्यानंतर दोन आठवड्यांहून अधिक काळ उलटूनही उत्सवकाळातील ध्वनीप्रदूषण कायदाभंगाच्या तक्रारी, नोंदवलेले गुन्हे, डेसिबल मोजणी आणि करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नसल्याचा आरोप मंचाने केला.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय हरित लवादाने सायलेंट झोनमध्ये नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाच्या घटनांबाबत कारवाई, आवाजाची पातळी मोजण्याची व्यवस्था, परवान्यांचे प्रदर्शन, अनामत रक्कम आणि नियमभंग झाल्यास ध्वनिवर्धक साहित्य जप्त करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

मंचाने दावा केला की, न्यायालयीन आदेशांनुसार प्रत्येक मंडळासमोरील ध्वनीपातळीची नोंद निश्चित कालावधीत प्रसिद्ध करणे, एकत्रित परवानगी देताना एकूण आवाजाची मर्यादा ओलांडली जाणार नाही याची दक्षता घेणे आणि उत्सवानंतर कारवाईचा अहवाल जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र पोलीस यंत्रणा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महापालिका या बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलनात करण्यात आला.

त्यामुळे गणेशोत्सवातील सर्व दिवसांच्या डेसिबल मोजणीचा सविस्तर अहवाल, विविध मंडळांविरुद्ध झालेली कारवाई, नोंदवलेले गुन्हे आणि जप्तीची माहिती तातडीने सार्वजनिक करावी, अशी मागणी लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने केली.

आता नवरात्रोत्सवानंतर दिवाळी तसेच विविध धर्मीय आणि महापुरुषांच्या जयंती-उत्सवांचा काळ येणार असल्याने ध्वनीप्रदूषण कायदा आणि न्यायालयीन आदेशांची कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मंचाचे म्हणणे आहे. पुणेकरांच्या सूचना मागवून शहरासाठी स्पष्ट नियमावली तातडीने जाहीर करावी, अशी मागणी मुकुंद किर्दत यांनी केली.

आंदोलनात मुकुंद किर्दत, चिंतामणी कांगो, अशोक मेहंदळे, डॉ. सिमी आठवले, आशिष गुंजाळ, श्रीकांत भिसे, डॉ. राहुल सावंत, नीता केळकर, राजश्री गावडे, शीला परळीकर, गिरिजा गोडबोले, शुभदा जोशी, ज्योती जाधव, अनुजा जोशी, हेमंत गोळे, पूनम माजगावकर, शंकर थोरात, अनंत झानपुरे, बापूसाहेब शिरोळे, वैदेही कुलकर्णी, चेतन पटवर्धन, अपर्णा आठवले, महादेव कराडकर, विवेक काशीकर, सुनील क्षीरसागर, अंकुश पाटील, रामचंद्र पराष्टेकर, श्रीनिवास गडकरी, अवधूत धर्मेंद्र, शुभदा सावुजी, मनीष गडे, कौस्तुभ ठकार, संजय खांदोडे, माधुरी दाबक, विवेक सरपोतदार, राजीव आगाशे, सुवर्णा जोशी, सुहास क्षीरसागर, अनिता पाटकर, अशोक अळवणी, माणिकचंद बाहेती, श्रीधर घाणेकर, समर्थ सावंत, प्रशांत कुलकर्णी, विनायक बेलापूरे, रामचंद्र कुलकर्णी यांच्यासह अनेक पुणेकर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन; दुष्काळ निधीसाठी सामंत यांच्याकडून १० लाखांची घोषणा

पुणे-राज्यात यंदा दुष्काळाचे मोठे संकट असून, संकटग्रस्त बांधवांना मदत...

राहुल गांधींचे आवाहन : “सर्व पक्षांनी एकत्र सर्वोच्च न्यायालयापुढे जाऊ ”

मोदी, शहा, डोवाल आणि मोहन भागवत यांना पायउतार...

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना 

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव’ ; धार्मिक...

श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘शृंगार’ या संकल्पनेवरील सजावट व विद्युतरोषणाईचे उद्घाटन

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग ; पोलीस आयुक्त अमितेश कुमार...