“पुणे बंदची भाषा खपवून घेणार नाही; महापौर नागपुरे-बिडकरांची तंबी”

Date:

‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकीय स्कोअर करू नका’; सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडूनही बंदच्या इशाऱ्यावर टीका

पुणे : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘पुणे बंद’चा इशारा दिल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान देत, “पुणे शहर बंद करून दाखवावे; पुणेकर त्यांना त्यांची जागा दाखवतील,” अशी भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडण्याचा अधिकार मान्य असला तरी शहरातील सर्वसामान्य नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि दैनंदिन व्यवहार वेठीस धरण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापौर नागपुरे म्हणाल्या की, पुणे हे विद्येचे माहेरघर असून राज्यभरातून लाखो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. शहराने विद्यार्थ्यांना कायम सामावून घेतले आहे. शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे आणि कोणत्याही पक्षाच्या राजकीय अजेंड्याचा भाग बनू नये, असे आवाहन त्यांनी केले.

‘पुणेकरांना त्रास होऊ देणार नाही’

पुणे बंद झाल्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रवास, रुग्णालयात जाणारे रुग्ण, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिक यांना फटका बसेल, असे नागपुरे यांनी नमूद केले. “विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडण्याचा आणि मागण्या करण्याचा पूर्ण अधिकार आहे; मात्र पुणेकरांना कुठलाही त्रास होता कामा नये,” असेही त्यांनी सांगितले.

रोहित पवार यांनी MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारवर दबाव वाढवत, निर्णय न झाल्यास पुणे बंद करण्याचा इशारा दिला होता. भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवल्याचा दावाही पवार यांनी केला आहे.

सभागृह नेते बिडकरांचाही विरोध

महापौरांसोबत पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या सभागृह नेते गणेश बिडकर यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या नावाखाली पुणे शहर वेठीस धरण्याच्या भूमिकेला विरोध केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा आणि संवाद व्हावा; मात्र शहरात भीतीचे वातावरण निर्माण करणे किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भाषा योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राजकीय रंग देऊन पुणे बंद करण्याची धमकी देणे योग्य नाही, असा त्यांचा सूर होता. आंदोलन लोकशाही मार्गाने करावे आणि पुणेकरांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल अशी परिस्थिती निर्माण करू नये, असे त्यांनी सांगितले.

MPSC आंदोलनावरून राजकीय संघर्ष

पुण्यात MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे भाजप आणि सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनाला राजकीय वळण दिल्याचा आरोप केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनीही आंदोलनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचा प्रश्न आता केवळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुरता मर्यादित न राहता मोठ्या राजकीय संघर्षात परिवर्तित होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

EC विरोधात विरोधकांचा मोर्चा रोखला; राहुल-प्रियांका, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात

‘लोकशाही वाचवा’ मोर्चात 19 विरोधी पक्षांचे खासदार; ज्ञानेश कुमारांच्या...

MPSC अध्यक्ष भीमनवारांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला; रोहित पवारांचा मोठा दावा

‘विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या इगोचा खेळ बनला’; पुण्यातील...