गुरुदेव श्री राकेशजी यांच्या हिरक महोत्सवी जन्मदिनाचे औचित्य; आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पशुसंवर्धन आणि अध्यात्मिक क्षेत्रांवर भर
पुणे : श्री राजचंद्र मिशन धरमपूरच्या वतीने आयोजित ‘अहो गुरुदेव’ या विशेष सोहळ्यात एकाच वेळी तब्बल ६० समाजोपयोगी उपक्रमांची घोषणा करण्यात आली. मिशनचे प्रणेते गुरुदेव श्री राकेशजी यांच्या हिरक महोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधून मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार हेमामालिनी, अभिनेते रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरही या सोहळ्यात सहभागी झाले.सोहळ्यास स्वामी चिदानंद सरस्वती, बी. के. शिवानी, आनंदमूर्ती गुरूमा, भिक्खू संघसेनजी आणि मोरारी बापू यांच्यासह विविध आध्यात्मिक गुरू उपस्थित होते. उद्योग क्षेत्रातून इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, दीपक पारेख, अशोक हिंदुजा, दिलीप संघवी, संजीव कपूर, मनोज मोदी आणि विनोद अदानी यांनी उपस्थिती लावली.
जाहीर करण्यात आलेल्या नव्या उपक्रमांमध्ये सामाजिक सेवा, आरोग्य, शिक्षण, मानसिक आरोग्य, महिला सक्षमीकरण, विशेष मुलांसाठी शैक्षणिक सुविधा, पशुरुग्णालये आणि निवारा केंद्रे यांसह विविध क्षेत्रांचा समावेश आहे. हे सर्व उपक्रम पुढील काळात टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आरोग्य आणि सेवाक्षेत्राला विशेष प्राधान्य देत कर्करोग रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, प्राणी रुग्णालये, पशुनिवारा केंद्रे, विशेष मुलांसाठी सुविधा केंद्रे आणि महिला सबलीकरणाचे विविध प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यासोबतच अध्यात्मिक केंद्रे, ध्यानकेंद्रे आणि सहा नवीन सत्संग केंद्रे उभारण्याचाही या उपक्रमांत समावेश आहे.
गुरुदेव श्री राकेशजी यांच्या प्रवचनांचे विविध भाषांमध्ये प्रकाशन करण्याचाही उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकी यांचा विस्तार अधिक व्यापक पातळीवर करण्याचा उद्देश या सर्व उपक्रमांमागे असल्याचे मिशनच्या वतीने सांगण्यात आले.
या सोहळ्यासाठी जगभरातील २४ देश आणि २१४ शहरांमधून मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते. उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, कला आणि राजकारण या क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
या नव्या ६० समाजोपयोगी उपक्रमांमुळे सेवा कार्याचा विस्तार होऊन समाजातील सेवाभावी वृत्तीला नवी चालना मिळेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

