मुंबईत तरुणांची गर्दी, सीजेपीच्या आंदोलनात नसरुद्दीन शाह; अभिजीत दिपकेंना शर्लिन चोपडाचाही पाठिंबा
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात ‘जेल भरो’ आंदोलन केले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने तरुणाईने प्रतिसाद दिला. यावेळी CJPचे संयोजक अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.विशेष म्हणजे, अभिनेत्री शर्लिन चोपडाने देखील सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दर्शवला आहे. तर, ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह (Nasruddin shah), शबाना आझमी यांनीही सहभागी होत अभिजीत दिपकेचं कौतुक केलंय.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले. “आज गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण आपल्या अधिकारांसाठी लढत आहोत. यापेक्षा गांधीजींना मोठी श्रद्धांजली असू शकत नाही,” असे दिपके यांनी आपल्या भाषणात म्हटले. गांधीजींचा विचार संपणार नाही, असे सांगत त्यांनी गांधी, नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा उल्लेख केला.
ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत दिपके म्हणाले की, देशातील लोकशाही अडचणीत आणणाऱ्या व्यक्तींना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. मतदानाच्या अधिकारावर गदा येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिपके यांनी विविध प्रशासकीय निर्णयांच्या पार्श्वभूमीवर लोकांना वारंवार रांगेत उभे राहावे लागत असल्याचा आरोप केला. “गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्यापेक्षा मोठे होण्याची कुणाचीही लायकी नाही,” असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना, आंदोलन केल्यास तुरुंगात टाकण्याच्या इशाऱ्याचा उल्लेख दिपके यांनी केला. “तीन दिवस नाही, तीन महिने तुरुंगात टाका; बाहेर आल्यानंतरही आम्ही तोच लढा सुरू ठेवू,” असे ते म्हणाले. यावेळी आंदोलकांनी “गांधी… गांधी…”, “वंदे मातरम्…” आणि “इस्तीफा दो…” अशा घोषणा दिल्या.
शिवाजी पार्क परिसरात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले होते. गांधीजींचा वेश परिधान केलेला एक तरुणही या आंदोलनात दिसून आला. गर्दी वाढू लागल्यानंतर पोलिसांनी शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या काही मार्गांवर बॅरिकेडिंग करून वाहतूक नियंत्रित केली.
या आंदोलनाला काही सेलिब्रिटींचीही उपस्थिती लाभली. अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला, तर ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनीही हजेरी लावत अभिजीत दिपके यांचे कौतुक केले. गायक विशाल ददलानी यांनीही उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.
दिल्लीनंतर आता महाराष्ट्राच्या राजधानीत CJPने आंदोलन उभारले असून, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीभोवती हा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे या आंदोलनातून दिसून आले.

