विविध भागांतील तक्रारींची श्रीनाथ भिमाले यांनी घेतली दखल
पुणे :शहरातील विविध भागांतील अस्वच्छता, साचलेला कचरा, विस्कळित पाणीपुरवठा आणि दूषित पाण्याच्या तक्रारींची स्थायी समितीच्या बैठकीत दखल घेण्यात आली. वानवडी, जांभूळवाडी, वाघोली आणि कात्रज परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी असून, संबंधित विभागांनी त्याकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला देण्यात आले.पुण्याच्या महापालिकेत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापौर मंजूषा नागपूरे, समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी जपान मधून ऑनलाइन सहभाग घेतला. समितीचे अन्य सदस्य आणि अधिकारी पुण्यात महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात प्रत्यक्ष उपस्थित होते.
शहरातील काही भागांत पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारीही गुरुवारी (दि.१) समितीच्या बैठकीत मांडण्यात आल्या. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित भागातील पाणीपुरवठ्याची व्यवस्था तपासून तो सुरळीत करण्याबरोबरच दूषित पाण्याच्या तक्रारींवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, वारंवार खंडित होणाऱ्या विद्युतपुरवठ्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याचेही बैठकीत निदर्शनास आले. काही भागांतील पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरता येत नसल्याने नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. विद्युत विभागाने याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेतील व्हॉल्व्हमनना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले.
बदलत्या हवामानामुळे ताप, थंडी, अंगदुखी, डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू, सर्दी-खोकला आदी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महापालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यांमध्ये रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संबंधित आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा ठेवून त्यांचा तुटवडा होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आले.
तातडीच्या आणि अत्यावश्यक सेवा-सुविधांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

