पहिला स्व. विक्रम गोखले सन्मान ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना
‘व्ही. शांताराम १२५’ निमित्त विशेष कार्यक्रम
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील १५२ चित्रपट होणार प्रदर्शित
पुणे : मुंबा फिल्म फाउंडेशन आयोजित सातवा मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दि. ६ ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला असून ४१ देशांमधून आलेल्या ९८७ चित्रपटांमधून १५२ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे आयोजक जय भोसले आणि महोत्सव संचालक वीरेंद्र चित्राव यांनी आज (दि. १) पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक अवचार, सहसचिव रोहित राव नरसिंगे, श्रुती शेंबेकर, प्रियांका चौधरी, रेणुका अग्रवाल तसेच मराठवाडा महाविद्यालयाच्या प्रतिनिधी नूतन कुलकर्णी उपस्थित होते. यंदाच्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC), फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) यांचा थेट सहभाग असल्याने महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी मिळाली आहे. चित्रपट रसिकांना महोत्सवात विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. महोत्सव राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे होणार आहे.
मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता व्ही. शांताराम १२५’ निमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्ही. शांताराम यांना आदरांजली वाहणारा, त्यांच्या चित्रपट सृष्टीतील कारकीर्दीचा आढावा घेणार लघुपट ‘द पोर्ट्रेट ऑफ अ पायोनियर’ दाखविला जाणार आहे. व्ही. शांताराम फाउंडेशनने या लघुपटाची निर्मिती केली असून मधुरा जसराज यांचे दिग्दर्शन आहे.
महोत्सवाचे उद्घाटन (दि. ६) सकाळी ११ वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे व्ही. शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे डायरेक्टर प्रकाश मगदुम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महोत्सवाची सुरुवात ‘द महाराष्ट्र फाईल’ या चित्रपटाने होणार आहे.
मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट सुरू करण्यामध्ये स्व. विक्रम गोखले यांचे अमूल्य योगदान होते. त्यांच्या स्मरणार्थ यंदाच्या वर्षीपासून स्व. विक्रम गोखले सन्मान सुरू करण्यात आला असून पहिल्या सन्मानाच्या मानकरी ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहेत.
सोनाली कुलकर्णी यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि इटालियन भाषांमधील सुमारे ऐंशीहून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्यांना मराठी चित्रपट पुरस्कारांसह राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या निमित्ताने सोनाली कुलकर्णी यांच्या ‘लाईक मां’ या नवीन लघुपटाचा प्रिमिअर पाहण्याची उत्तम संधी रसिकांना मिळणार आहे. निरू शर्मा यांचे लेखन आणि दिग्दर्शन आहे.
समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून फिल्म ॲण्ड टेलिव्हिजनचे कुलगुरू धीरज सिंह यांची उपस्थिती असणार आहे. त्यांच्या हस्ते पारितोषिकप्राप्त लघुपटांचा सन्मान केला जाणार आहे.
महोत्सवात माहितीपट, लघुपट आणि आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म्स दाखविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ५ मास्टर क्लासेस, पॅनल डिस्कशन्स आणि ओपन फोरम्सचेही आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थी, प्रेक्षक आणि उदयोन्मुख फिल्ममेकर्स यांना थेट तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. महोत्सवाच्या कालावधीत देश-विदेशातील विविध चित्रपटांचे स्क्रीनिंगही होणार आहे.
या महोत्सवाचे सहसंयोजक म्हणून फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी, एमआयटी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म स्कूल, मराठवाडा मित्र मंडळाचे कॉमर्स कॉलेज, वृत्तपत्र संज्ञापन विभाग यांचा सहभाग आहे. या संस्थांच्या सहकार्यामुळे चित्रपट महोत्सव अधिक व्यापक होत असून, विद्यार्थी, नागरिक आणि सिनेरसिकांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

