गुन्हे शाखा युनिट-५ आणि अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोन आरोपींना अटक
पुणे, दि. १ : फुरसुंगी येथील उरुळी देवाची परिसरात सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-५ आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संयुक्त छापा टाकून दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत सुगंधित तंबाखू, पाऊच पॅकिंग मशीन, आरओ वॉटर, मेंथॉल, ग्लिसरॉलसह अमूल कंपनीचे चीज असा एकूण ३१ लाख ९१ हजार ६०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी फुरसुंगी येथील उरुळी देवाची परिसरात सुगंधित तंबाखू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-५चे पोलीस अंमलदार नासिर देशमुख आणि सुधीर सोनवणे यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर युनिट-५च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना खातरजमा करून कारवाईचे आदेश देण्यात आले.
पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे अवैधरित्या सुगंधित तंबाखू तयार होत असल्याचे आढळले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनातील अन्न प्रशासन अधिकारी नारायण सरकटे, पूजा बगाडे आणि मोहिते यांना बोलावण्यात आले. घर क्रमांक ११-४४१३, सर्व्हे नं. २२/२, आदर्शनगर, उरुळी देवाची येथे संयुक्त छापा टाकण्यात आला.
या ठिकाणी सुशिलसिंग विश्वनाथ तोमर (वय २६, सध्या रा. घर क्र. ११-४४१३, सर्व्हे नं. २२/२, आदर्शनगर, उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. तारेनी, मुरैना, मध्यप्रदेश) आणि उमेशसिंग रामदीन तोमर (वय २३, रा. तारेनी, मुरैना, मध्यप्रदेश) हे दोघे आढळून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. Crime Unit-5 Press Note Image …
छाप्यात सुगंधित तंबाखू पदार्थांनी भरलेले ५९ बॉक्स, पाऊच पॅकिंग मशीन, आरओ वॉटर, मेंथॉल बॉक्स, ग्लिसरॉल कॅन तसेच अमूल कंपनीच्या चीजचे १,०८० डबे जप्त करण्यात आले. जप्त मालाची एकूण किंमत ३१ लाख ९१ हजार ६०८ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४४२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(२)(c), २७(३)(e), ३०(२)(a), ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. Crime Unit-5 Press Note Image …
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौरव हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, तसेच पोलीस अंमलदार नासिर देशमुख, सुधीर सोनवणे, अमर चव्हाण, प्रताप गायकवाड, अकबर शेख, परमेश्वर कदम, शहाजी काळे, राहुल गोसावी, राहुल ढमढेरे, नेत्रिका अडसूळ, जयश्री भालेराव, मयुरी पालवे आणि श्रीदेवी फाळके यांनी सहभाग घेतला.
अन्न प्रशासन विभागाकडून अन्न प्रशासन अधिकारी नारायण सरकटे, पूजा बगाडे आणि मोहिते यांनी कारवाईत सहभाग घेतला.

