डॉ. श्री श्री पीतांबर देव गोस्वामी यांचे उद्गार
सरहदतर्फे गुजर – निंबाळकरवाडी येथे उभारण्यात आलेल्या ‘नामघर’चे लोकार्पण
पुणे : आसाममध्ये संत शंकरदेव आणि महाराष्ट्रात संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज यांनी आपल्या वाणी, लेखणीतून मध्ययुगात प्रतिकूल परिस्थितीत समाजजागर घडविला. त्याचे स्मरण करत ‘नामघर’ उभारणीतून महाराष्ट्र आणि आसामची वाणी जणु एकरूप झाली आहे, असे भावपूर्ण उद्गार आसाम येथील जोरहाटच्या औनियाती सत्राचे विद्यमान सत्राधिकारी व औनियाती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्री श्री पीतांबर देव गोस्वामी यांनी बुधवारी येथे काढले. आसाममध्ये ‘नामघर’ हे सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनाचे केंद्र आहे, पण महाराष्ट्रात आणि पुण्यात प्रथमच ‘नामघर’ उभारणे, आजच्या परिस्थितीत औचित्यपूर्ण आहे. याचे श्रेय संजय नहार यांना आहे, असेही ते म्हणाले.
सरहद, पुणेतर्फे संस्थेच्या गुजर – निंबाळकरवाडी येथील संकुलात उभारण्यात आलेल्या ‘नामघर’च्या लोकार्पण प्रसंगी डॉ. श्री श्री पीतांबर देव गोस्वामी बोलत होते. सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नागालॅंड विद्यापीठाचे कुलपती आणि आसामचे माजी राज्य माहिती आय़ुक्त डॉ. समुद्रगुप्त कश्यप, डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनापूर्वी उपस्थित सर्व मान्यवरांचा सहभाग असलेली आकर्षक शोभायात्रा प्रांगणाच्या प्रवेशद्वारापासून ‘नामघर’ वास्तूपर्यंत काढण्यात आली. पूर्णपणे आसामी पारंपरिक पद्धतीच्या या शोभायात्रेत आसामची वाद्ये वाजवली जात होती. पारंपरिक आसामी पेहराव केलेल्या स्त्री-पुरुषांचा समुदाय सोबत चालत होता. नामघरामध्ये स्थापित करण्यात आलेल्या भागवत ग्रंथाची प्रत मिरवत नामघरात आणण्यात आली. यावेळी उच्चस्वरातील आसामी भाषेतील कीर्तने गायिली गेली.
गोस्वामीजी पुढे म्हणाले, नामघर हे भक्ती परंपरेचे निखळ, शुद्ध स्वरूप मानले जाते. सत्कथा, सत्संग, सद्भावना, सद्वर्तन आणि सत्कर्म यांचे संस्कार नामघर देते. नाम हे नादब्रह्म – शब्दब्रह्माचे प्रतीक आहे. नादरूपं परमश्रुतिः, असे वचन आहे. नामाचा महिमा नामउच्चारणातून म्हणजेच नामकीर्तनातून इथे केला जातो. नाम हरीचे, विष्णुचे, श्रीकृष्णाचे असते. जिथे नाम तिथे हरीचा वास असतो. नामघरात या कीर्तनाचे सामूहिक उच्चारण होते. नामघर हे धार्मिक स्थळ नव्हे, ते संग्रहालय, सभागृह आहे. प्रसंगी ते नाट्यगृह आहे. सांस्कृतिक प्रशिक्षणाचे केंद्र आहे. आपल्या पंचज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांना सत्कर्मासाठी प्रवृत्त करण्याचे संस्कार देणारे केंद्र आहे. श्रद्धा आणि निष्ठेचे ते स्थान आहे. अशा नामघरात संकीर्तन घडत राहो, असे आशीर्वाद त्यांनी दिले.
डॉ. सदानंद मोरे यांनी आसाममधील विष्णुभक्ती परंपरा आणि महाराष्ट्रातील भागवत संप्रदाय तसेच वारकरी परंपरेचा अनुबंध उलगडला. महाराष्ट्रात संतांनी जे समाज जोडण्याचे कार्य केले; समता, मानवतेचे संस्कार दिले, तोच धागा आसाम परिसरात शंकरदेव यांनी पुढे नेला. नामसंकीर्तन, भारूडे, गवळणीतून मानवतेचा संदेश संतांनी महाराष्ट्रात पोहोचविला, त्याचप्रकारे शंकरदेव यांनी आसाममध्ये वैष्णव परंपरा रुजविण्यासाठी नाट्यकलेला उपासनेचा भाग बनविले, हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. नामधारकाला फक्त मानवतेचा धर्म असतो, जातीधर्मभेदातीत जाण्याचा संदेश या संतांनी दिला. महाराष्ट्र आणि आसाम यांना जोडणारा हा धागा विलक्षण आहे, असेही डॉ. मोरे म्हणाले.
डॉ. समुद्रगुप्त कश्यप यांनी शंकरदेव यांनी रचलेल्या संस्कृत भारतभूप्रशंसा या कवनाचा उल्लेख केला. केवळ आसाम प्रांत नव्हे, तर संत शंकरदेवांनी समस्त भारतवर्षासाठी मानवतेचा, समानतेचा, सलोख्याचा संदेश दिला आहे. सरहदच्या माध्यमातून संजय नहार अशाच मानवतेच्या संदेशासाठी कार्य करत आहेत. नामघरचे उद्घाटन हे त्याचे उत्तम उदाहरण ठरावे, असे ते म्हणाले.
संजय नहार यांनी नामघरच्या माध्यमातून पुन्हा नव्याने महाराष्ट्र आसामशी जोडला गेल्याची भावना व्यक्त केली. संत शंकरदेव यांनी पंधराव्या शतकात जो प्रागतिक दृष्टीकोन मांडला, तोच विचार महाराष्ट्रात संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेवादी संतांनी मध्ययुगात मांडला. यामध्ये संत शंकरदेव यांचे योगदान असाधारण आहे. महाराष्ट्राला मराठी भाषेत त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा म्हणूनच आम्ही त्यांचे चरित्र आणि कार्य मराठीमध्ये उपलब्ध केले आहे. नामघर उभारताना भक्ती परंपरेचा हा धागा अधिक दृढ करण्याचा संकल्प मनात आहे, असे ते म्हणाले.
यावेळी देविका बोरठाकूर, साक्षी गायकवाड यांनी नृत्यप्रस्तुती केली. डॉ. निवा देवी सर्मा आणि प्रतिभा दुधाने यांनी सूत्रसंचालन केले.

