पुणे : विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासनाने सर्व विभागांना काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. अत्यावश्यक कामांचा अपवाद वगळता नवीन विकासकामे सुरू करणे, नवीन कामांना प्रशासकीय किंवा तांत्रिक मान्यता देणे तसेच नवीन निविदा प्रसिद्ध करणे अथवा निविदा प्रक्रियेतील पुढील कार्यवाही करताना भारत निवडणूक आयोग आणि सक्षम निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशांचे पालन करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्तांनी ३० सप्टेंबर रोजी याबाबत कार्यालयीन परिपत्रक काढले आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रामध्ये आदर्श आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेतील सर्व विभागप्रमुख, खातेप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली देखभाल व दुरुस्तीची कामे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि अत्यावश्यक सेवांच्या दृष्टीने आवश्यक असतील तरच हाती घेता येणार आहेत. अशा कामांसाठी संबंधित विभागाने कामाची तातडी आणि कारणे स्पष्ट करून अतिरिक्त आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. पूर्वपरवानगीशिवाय अशी कामे सुरू करता येणार नाहीत.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवीन विकासकामे, नवीन कामांना प्रशासकीय किंवा तांत्रिक मान्यता देणे, नवीन निविदा प्रसिद्ध करणे किंवा निविदा प्रक्रियेतील पुढील कार्यवाही करण्याबाबत भारत निवडणूक आयोग अथवा सक्षम निवडणूक प्राधिकरणाच्या लागू निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे.
निविदांशी संबंधित कोणतीही नवीन कार्यवाही किंवा प्रलंबित निविदा प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकरण अथवा महापालिका आयुक्तांची आवश्यक पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय करता येणार नाही.
आचारसंहितेच्या काळात अत्यावश्यक सेवा, आपत्कालीन परिस्थिती, नागरिकांच्या जीवितास किंवा सार्वजनिक मालमत्तेस निर्माण होणारा धोका अथवा अन्य अपरिहार्य परिस्थिती वगळता कोणतेही नवीन काम हाती घेता येणार नाही, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पातील नगरसेवकांच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमधून, तसेच आमदार आणि खासदार यांच्या अर्थसंकल्पीय किंवा शिफारशीच्या तरतुदींमधून प्रस्तावित, मंजूर किंवा हाती घ्यावयाची कामे आचारसंहिता लागू असताना सुरू करू नयेत किंवा त्याबाबत पुढील कार्यवाही करू नये. मात्र अत्यावश्यक स्वरूपाची कामे करणे अपरिहार्य असल्यास त्याची कारणमीमांसा स्पष्टपणे नोंदवून सक्षम प्राधिकरण किंवा महापालिका आयुक्तांची आवश्यक पूर्वपरवानगी घेऊनच कार्यवाही करावी. या प्रक्रियेत आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात. तसेच भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य किंवा सक्षम निवडणूक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
या सर्व सूचनांच्या पालनाची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांची राहणार आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुखांची राहील, असा स्पष्ट इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.

