मुंबई : दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला खराब हवामान आणि जोरदार टर्ब्युलन्सचा फटका बसला. विमान मुंबईच्या हवाई हद्दीत पोहोचल्यानंतर लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रतिकूल हवामानामुळे सुरक्षितपणे उतरवणे शक्य झाले नाही.
परिस्थिती अनुकूल होण्याची प्रतीक्षा करत विमानाला काही काळ हवेतच घिरट्या घालाव्या लागल्या. सुमारे सव्वा तास विमान हवेत राहिल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने त्याचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि विमान सुरत विमानतळाकडे डायव्हर्ट करण्यात आले.
मुंबईत लँडिंगचा प्रयत्न निष्फळ
मुंबई विमानतळ परिसरात हवामान खराब असल्याने तसेच हवेत तीव्र झोके जाणवत असल्याने लँडिंगमध्ये अडथळे निर्माण झाले. वैमानिकाने मुंबईत विमान उतरवण्याचा प्रयत्न केला; मात्र परिस्थिती सुरक्षित नसल्याचे लक्षात आल्यानंतर विमान हवेतच थांबवण्यात आले.
काही काळ परिस्थिती सुधारण्याची प्रतीक्षा केल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विमान सुरतला वळवण्यात आले. अखेर विमानाचे सुरत विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
सुरत विमानतळावर प्रवासी अडकले
विमान सुरतला उतरवल्यानंतरही प्रवाशांची प्रतीक्षा कायम राहिली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 8 वाजेपर्यंत विमान सुरत विमानतळावरच उभे होते. त्यामुळे मुंबईला पोहोचण्याच्या अपेक्षेने दिल्लीहून निघालेल्या प्रवाशांना अनेक तास सुरत येथे थांबावे लागले.
विमान पुन्हा मुंबईकडे कधी रवाना होणार, याबाबत काही काळ प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
खराब हवामान आणि टर्ब्युलन्सच्या पार्श्वभूमीवर विमानाचे मुंबईतील लँडिंग पुढे ढकलण्यात आले आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुरतला डायव्हर्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

