नागालॅंड विद्यापीठाचे कुलपती डॉ. समुद्रगुप्त कश्यप यांचे प्रतिपादन
प्रशांत तळणीकर लिखित ‘श्रीमंत शंकरदेव’ पुस्तकाचे पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे : नामस्मरण, गायन, वादन, नृत्य, नाट्य, वस्त्रनिर्मिती, अभिनयादी कलांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना विशेषतः निरक्षरांनाही उपासना आणि मानवतेशी जोडण्याचे महान कार्य संत शंकरदेव यांनी केले, असे प्रतिपादन नागालॅंड विद्यापीठाचे कुलपती तसेच आसामचे माजी राज्य माहिती आयुक्त डॉ. समुद्रगुप्त कश्यप यांनी मंगळवारी येथे केले.
सरहद पुणे आणि चिनार पब्लिशर्स आयोजित प्रशांत तळणीकर लिखित आसामचे संत श्रीमंत शंकरदेव या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात डॉ. समुद्रगुप्त कश्यप अध्यक्षपदावरून बोलत होते. पुणे महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक नवल किशोर राम, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त अभय महाराज टिळक, पुणे आर्ट अँड कल्चर फाऊंडेशनच्या संचालक गायत्री मिश्रा-कोल्हटकर, लेखक प्रशांत तळणीकर, सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, शैलेश पगारिया आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. कश्यप यांनी संत शंकरदेव यांच्या बहुपेडी व्यक्तिमत्वाची माहिती देत शंकरदेव निर्मित वृंदावनी वस्त्राचे १५ व्या शतकातील नमुने ब्रिटिश म्यूझियमसह फ्रान्स, अमेरिकेतील काही संग्रहालयात जतन केल्याचे सांगितले. या वस्त्रावर श्रीकृष्णाच्या बालरूपातील चरित्रप्रसंग अंकित केल्याची माहिती त्यांनी दिली. जागे व्हा, एकत्र व्हा, नामस्मरण करा आणि सारे अंधारातून प्रकाशाकडे जाऊ या, ही त्यांची शिकवण होती. संघर्ष टाळून ईशस्मरणातून, श्रवण – कीर्तन – दर्शन – संगीतादी कलांच्या माध्यमातून भागवतातील विष्णुरूप समजून घ्या, असा त्यांचा संदेश होता.
अभय टिळक यांनी पंधराव्या शतकातील शंकरदेव आणि मध्ययुगीन महाराष्ट्रातील संतपरंपरेचे नाते विवेचनातून उलगडले. संतसंग, संपूर्ण शरणभाव म्हणजे दास्यभक्ती आणि नामसंकीर्तन, ही त्रिसूत्री महाराष्ट्रातील संतपरंपरा आणि आसाम तसेच ईशान्येकडील संतविचार, यांच्यातील साम्य उलगडणारी आहे. हार – प्रहार समान मानणारी संतत्वाची निजखूण सदैव लोकभाषेतून लोकमाध्यमातून संतांनी आपलीशी केल्याचे ते म्हणाले. तत्कालीन समाजात प्रचलीत वामाचाराकडून अवनत विचारांकडून समाजमन उन्नयनाकडे वळविण्याचे कार्य संत शंकरदेव यांनी केले. लोकसंग्रहामार्फत सामाजिक उन्नयन घडविण्याचा संदेश त्यांनी दिला. तसेच सांस्कृतिक परंपरांच्या शुद्धीकरणाचा मार्ग दाखवला, असे ते म्हणाले.
नवल किशोर राम यांनी इतिहासातील विशिष्ट कालखंडांवर विशिष्ट विचारधारांचा प्रभाव कसा पडत जातो, यासंदर्भात विवेचन मांडले. पंधराव्या शतकात संत शंकरदेव यांनी ईशान्येकडे, गुरू नानकांनी उत्तर व मध्य भारतात, संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्रात तर दक्षिणेकडील संतांनी विभाजित समाजाला मानवतेचे, समानतेचे, बंधुतेचे, सलोख्याचे नाते आपल्या विचार व आचरणांतून समजावले. मूर्तीपूजा, जातीभेदातीत विचारांची शिकवण दिली. त्या काळातील भौगोलिक अंतराचा विचार करता, सर्व संतांनी विविध प्रांतात एकाच आशयाचा संदेश दिल्याचे आढळते, हे फार मोठे वैशिष्ट्य आहे, असे ते म्हणाले.
गायत्री मिश्रा- कोल्हटकर म्हणाल्या, संत शंकरदेव यांचा उल्लेख महापुरुष असाच केला जातो कारण ते बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते. ज्ञानवंत, विचारवंत, कलावंत, प्रज्ञावंत, प्रतिभावंत..अशी अनेक रूपे त्यांच्यात सामावलेली होती आणि त्या प्रत्येक पैलूच्या माध्यमातून त्यांनी समाजहिताचा विचार व कृती केली.
प्रास्ताविकात संजय नहार यांनी आपल्या संतपरंपरेचे, वारकरी संप्रदायाचे ईशान्येकडील भागातील आपल्या नागरिकांशी नाते दृढ व्हावे, हा उद्देश असल्याचे सांगितले.
शैलेश वाडेकर यांनी आभार मानले. सांची मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

