५६% एसएमई वार्षिक महसुलातील ६ ते १०% हिस्सा आयटीवर; त्यातील ४५% बजेट सायबर सुरक्षेसाठी
मुंबई : पश्चिम भारतातील लघु आणि मध्यम उद्योग सायबर सुरक्षेवरील गुंतवणुकीच्या बाबतीत देशात आघाडीवर असल्याचे टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस (TTBS) आणि सायबरमीडिया रिसर्च (CMR) यांच्या ‘SME Digital Insights 2026: Cybersecurity’ या अभ्यासातून समोर आले आहे. पश्चिम भारतातील ५६ टक्के एसएमई त्यांच्या वार्षिक महसुलातील ६ ते १० टक्के हिस्सा माहिती तंत्रज्ञानावर खर्च करत असून, या आयटी बजेटमधील तब्बल ४५ टक्के हिस्सा सायबर सुरक्षेसाठी राखून ठेवत आहेत.
अभ्यासानुसार, पश्चिम भारतातील ५५ टक्के लघु आणि मध्यम उद्योग त्यांच्या सायबर सुरक्षा व्यवस्थापनासाठी बाहेरील विशेषज्ञ तंत्रज्ञान भागीदारांना प्राधान्य देतात. पुढील वर्षभरात ५१ टक्के कंपन्या सुरक्षा देखरेख मजबूत करण्याची, तर ४५ टक्के कंपन्या नियमपालन आणि अनुपालन अधिक सक्षम करण्याची योजना आखत आहेत.
सायबर सुरक्षा अंमलबजावणीत तज्ज्ञ कौशल्यांची कमतरता हे मोठे आव्हान असल्याचेही निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे. सुमारे ४५ टक्के एसएमईंनी ही समस्या मान्य केली असून, त्यामुळे तज्ज्ञ तंत्रज्ञान भागीदारांची गरज वाढत असल्याचे अभ्यासातून दिसते.
टाटा टेलिसर्व्हिसेसचे व्हाइस प्रेसिडेंट मन्नू सिंह यांनी सांगितले की, पश्चिम भारतातील लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय अधिक सुरक्षित आणि डिजिटल करण्यासाठी गांभीर्याने पुढे येत आहेत. कंपन्या केवळ तंत्रज्ञानावर खर्च करत नाहीत, तर सायबर सुरक्षेला दैनंदिन कामकाजाचा भाग बनवण्यावरही भर देत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अभ्यासात एक महत्त्वाची तफावतही समोर आली. कंपन्यांची सायबर सुरक्षेवर खर्च करण्याची तयारी वाढत असली तरी केवळ १२ टक्के एसएमई त्यांच्या सायबर सुरक्षा नेटवर्कची सातत्याने देखरेख करतात. अनेक कंपन्या अजूनही विखुरलेल्या सुरक्षा साधनांवर किंवा सायबर हल्ला झाल्यानंतर उपाय शोधण्याच्या पद्धतीवर अवलंबून असल्याचे आढळले.
राष्ट्रीय पातळीवरही सायबर सुरक्षेला वाढते महत्त्व मिळत आहे. अभ्यासानुसार, ८४ टक्के भारतीय एसएमई पुढील १२ ते २४ महिन्यांत सायबर सुरक्षेवरील गुंतवणूक वाढवण्याच्या तयारीत आहेत, तर मध्यम आकाराच्या ८९ टक्के उद्योगांनी गुंतवणूक वाढवण्याची भूमिका घेतली आहे. मात्र ४६ टक्के एसएमई अजूनही त्यांच्या एकूण आयटी बजेटपैकी ५ टक्क्यांपेक्षा कमी हिस्सा सायबर सुरक्षेवर खर्च करतात.
गेल्या २४ महिन्यांत ४० टक्के एसएमईंना कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील सायबर हल्ला किंवा सुरक्षा त्रुटीचा सामना करावा लागला. त्यापैकी केवळ २८ टक्के कंपन्यांनी आपल्या मूलभूत सुरक्षा रचनेत दीर्घकालीन बदल केले, तर ६० टक्के कंपन्यांनी फक्त तात्पुरती किंवा कामचलाऊ टूल अपग्रेड करून परिस्थिती हाताळल्याचे निष्कर्षात नमूद आहे.
सायबर सुरक्षेत कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिकाही वाढत असल्याचे दिसते. ३५ टक्के एसएमईंना एआयमुळे धोके लवकर ओळखणे, स्वयंचलित देखरेख करणे आणि त्वरित प्रतिसाद देणे शक्य होईल असे वाटते; तर ३४ टक्के कंपन्यांना पुढील १२ ते २४ महिन्यांत एआय-आधारित सायबर धोक्यांचा व्यवसायावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती आहे.
हा अभ्यास दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे या आठ शहरांमध्ये करण्यात आला. सर्वेक्षणात एकूण ८०० आयटी प्रमुख आणि निर्णयकर्त्यांचा सहभाग होता. यामध्ये १५० सूक्ष्म, ३५० लघु आणि ३०० मध्यम उद्योगांचा समावेश होता.

