65 पेक्षा अधिक देशांतील 2,000 पेक्षा अधिक हितधारकांचा सहभाग; आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात 125 पेक्षा अधिक प्रदर्शक उपाययोजनांचे सादरीकरण करणार
भारत 15 ते 18 सप्टेंबर 2026 दरम्यान गुजरातमधील गांधीनगर येथे जागतिक चक्राकार अर्थव्यवस्था मंच (डब्ल्यूसीईएफ) 2026 चे यजमानपद भूषवणार आहे. दक्षिण आशियातील प्रथमच आयोजित होणाऱ्या या मंचाचे उद्घाटन 15 सप्टेंबर रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते संयुक्तपणे होणार आहे. ‘चक्राकार अर्थव्यवस्था : लोक आणि समृद्धीसाठी संक्रमण’ या संकल्पनेखाली या मंचाचे आयोजन करण्यात येणार आहे.
चक्राकार अर्थव्यवस्थेत विद्यमान साहित्य आणि उत्पादनांचा पुनर्वापर, पुनर्सुधारणा आणि पुनर्चक्रण करून त्यांना मौल्यवान संसाधने म्हणून पुन्हा अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात आणण्यावर भर देण्याची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत पर्यावरणीय प्रशासनामध्ये मोठ्या परिवर्तनाचे नेतृत्व करत असून, आधुनिक चक्राकार अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे.
डब्ल्यूसीईएफ 2026 चा उद्देश चक्राकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने केलेल्या उपक्रमांचे प्रदर्शन करणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ करणे हा आहे. या कार्यक्रमात 65 पेक्षा अधिक देशांतील 2,000 हून अधिक विविध क्षेत्रांतील हितधारक सहभागी होणार आहेत. यामध्ये उद्योग क्षेत्रातील नेते, उद्योजक, नवोन्मेषक, संशोधक, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, परिवर्तन घडवणारे कार्यकर्ते आणि इतरांचा समावेश असेल.
हा मंच जागतिक सहकार्याला चालना देण्याबरोबरच ग्लोबल साऊथ देशांसोबत अधिक व्यापक सहभागासाठी विचारमंच उपलब्ध करून देईल. तसेच चक्राकार अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक वित्तपुरवठा आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणूक उभारण्यास मदत करेल; धोरणात्मक संवाद आणि विविध क्षेत्रांमधील भागीदारीला प्रोत्साहन देईल; तसेच चक्राकार अर्थव्यवस्थेसाठी नवोन्मेष, डिजिटलायझेशन आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला चालना देईल.
15 आणि 16 सप्टेंबर 2026 रोजी या मंचामध्ये 4 पूर्ण अधिवेशने आणि 16 समांतर विषयाधारित सत्रे आयोजित केली जातील. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, रोजगारनिर्मितीची क्षमता, ऊर्जा निर्मिती, वित्तपुरवठा, प्रशासन, शाश्वत उत्पादने, औद्योगिक उपाययोजना, स्टार्ट-अप परिसंस्था आणि युवा नेतृत्व अशा विविध विषयांवर चर्चा होईल.
या कार्यक्रमादरम्यान 125 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शकांचा समावेश असलेले प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. या प्रदर्शनात स्टार्टअप्सनी विकसित केलेल्या प्रत्यक्ष वापरातील उपाययोजना तसेच गुंतवणुकीसाठी सज्ज असलेल्या नवोन्मेषी उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात येईल.
डब्ल्यूसीईएफच्या अनुषंगाने, शाश्वत उपभोग आणि उत्पादन पद्धतींवरील 10 वर्षांच्या कार्यक्रमांच्या आराखड्याच्या (10 वायएफपी) मंडळाची प्रत्यक्ष बैठक 15 सप्टेंबर रोजी गांधीनगर येथे होणार आहे. शाश्वत उपभोग आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यामध्ये भारताने दीर्घकाळ बजावलेल्या नेतृत्वाची दखल घेत, भारताने अलीकडेच 10 वायएफपी मंडळाच्या सह अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
17 आणि 18 सप्टेंबर 2026 रोजी जागतिक सहकारी संस्था आणि भागीदारांकडून 80 (ॲक्सलरेटर सेशन्स) सत्रांचे स्वतंत्रपणे आयोजन करण्यात येणार आहे. ही सत्रे ऑनलाइन/हायब्रिड पद्धतीने तसेच गांधीनगर आणि जगभरातील इतर ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित केली जातील.

