जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्न

Date:

चाकण एमआयडीसीतील रस्त्यांच्या विकासाला गती; बहुतांश कामे सुरू

राष्ट्रीय महामार्गावरील फोडलेले दुभाजक बंद; वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी कमी करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी रस्ते व अन्य पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रस्त्यांच्या विकासकामांपैकी बहुतांश कामे सुरू झाली असून, पूर्ण झालेल्या तसेच प्रगतिपथावर असलेल्या कामांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेत आगामी काळात मोठा बदल अपेक्षित आहे.

याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आज चाकण एमआयडीसी पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. बैठकीत रस्ते विकासासह वाहतूक व्यवस्थापन, वाहनतळ, पाणी निचरा, वीजपुरवठा, रस्तादुभाजक व परिसर सुशोभीकरण आदी कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, आमदार शंकर मांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महावितरण, जीवन प्राधिकरण यांचे अधिकारी, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

रस्त्यांचा एकत्रित आढावा
चाकण औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीच्या अखत्यारितील २५ किलोमीटर, राष्ट्रीय महामार्गाचे १२.८ किलोमीटर, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे २२ किलोमीटर आणि पीएमआरडीएच्या अखत्यारितील १७.५ किलोमीटर रस्त्यांचा समावेश आहे. विविध प्राधिकरणांच्या अखत्यारितील या रस्त्यांच्या कामांमध्ये आवश्यक समन्वय साधून ती गतीने पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

महत्त्वाच्या रस्त्यांची कामे वेगाने सुरु
चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक २ मधील ७५ मीटर रुंदीच्या मुख्य रस्त्याच्या ५.५० किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

टप्पा क्रमांक ४ मधील सहापदरी रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण, दोन्ही बाजूंच्या पदपथांची दुरुस्ती, मध्यभागी सिमेंट काँक्रीटचे रस्तादुभाजक बसविणे आणि सुशोभीकरणाचे ४.०३ किलोमीटर लांबीचे काम सुरू असून आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

यासोबतच टप्पा क्रमांक १ व २ मधील मुख्य रस्त्यांचे १४.६५ किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रीटीकरण, टप्पा क्रमांक ३ मधील आळंदी फाटा (स्पायसर चौक) ते व्होक्सवॅगन-स्कोडा कंपनीपर्यंतच्या ५.७० किलोमीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि टप्पा क्रमांक ५ मधील ४.४० किलोमीटर लांबीच्या चौपदरी मुख्य रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे.

वाहतूक कोंडीवर मनुष्यबळासह यंत्रणांची मदत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ४५ एमएसएफ जवानांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्यालयाकडून मान्यता मिळाली असून याबाबत पोलीस विभागास कळविण्यात आले आहे.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना एमआयडीसीमार्फत एक क्रेन आणि ५० जॅमर उपलब्ध करून देण्यासही मान्यता मिळाली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी फोडण्यात आलेले दुभाजक बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली असून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.

वाहनतळ सुरू; पाणी निचऱ्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था
औद्योगिक क्षेत्रातील वाहनतळ सुरू झाले असून वाहनांची पार्किंग नियोजित ठिकाणी करण्यात येत आहे. रस्त्यांच्या साईड पट्ट्यांचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.

ज्या ठिकाणी पाणी साचते, त्या ठिकाणी भविष्यात पाणी साचणार नाही, यासाठी सल्लागार कंपनीच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाणी निचरा व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता पावसाळ्यातही प्रभावी ठरेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

वीजपुरवठा क्षमता वाढविण्यावर भर
महावितरणचा आवश्यक ट्रान्सफॉर्मर संबंधित ठिकाणी उपलब्ध झाला असून त्यासाठीचे बांधकाम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे एमआयडीसीला अपेक्षित असलेल्या वीजपुरवठ्यापेक्षा अधिक वीज उपलब्ध होणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

रस्तादुभाजक व परिसर सुशोभीकरणाचे नियोजन
रस्तादुभाजकांच्या देखभालीसाठी नियमित निरीक्षण व देखरेख आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या. तसेच औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन शहरी भू-दृश्यीकरणाच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार बाबाजी काळे यांनी औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या व सूचना मांडल्या. त्यावर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदम

पुणे: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ....

गणेशोत्सव काळात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी बसविरोधात विशेष तपासणी मोहीम

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या खासगी...

भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलत

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवारांना थेट सहभागाची संधी पुणे,...