पुणे:
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांना आपल्या उत्सवांची व संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांच्या माध्यमातून ‘गणेशमूर्ती कार्यशाळा व स्पर्धा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात परिसरातील तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वतःच्या हातांनी आकर्षक व देखण्या पर्यावरण मूर्ती बनवल्या.
या कार्यशाळेत पुण्यातील प्रसिद्ध मूर्तिकार विनोद येलारपुरकर यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणरायाची सुबक मूर्ती साकारण्याचे शास्त्रोक्त व कलात्मक प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी अत्यंत उत्साहाने विविध रूपांतील ३०० पर्यावरण मूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ५ ते ७ वर्षे, ८ ते १० वर्षे आणि ११ ते १५ वर्षे अशा तीन स्वतंत्र वयोगटांमध्ये स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. तिन्ही वयोगटांतील मुलांनी मोठ्या कल्पकतेने गणेशमूर्ती साकारल्या. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आगामी गणेशोत्सवादरम्यान विशेष समारंभात आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना कलाशिक्षक अमोल काळे, प्रसिद्ध कलाकार निलेश खराडे, मूर्तिकार कुणाल कर्नावत आणि मूर्तिकार माधवी येलारपुरकर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
या उपक्रमास कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने, नगरसेविका स्वप्नाली पंडित, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष अमित कंक यांच्यासह अनेक मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पर्यावरण मूर्तींची पाहणी करून मुलांच्या कौशल्याचे मनापासून कौतुक केले. हा संपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ‘राघवेंद्र बाप्पू मानकर मित्र परिवारा’च्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
“विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच आपल्या संस्कृतीची ओळख आणि संस्कार बालवयातच व्हावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय वयातच विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांतून प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने आपली समृद्ध संस्कृती जोपासण्यासाठी भावी पिढी निश्चितच सक्षम होईल,” असा विश्वास यावेळी नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी व्यक्त केला.

