मीटरचे सील तोडून गती कमी करण्याचा प्रयत्न
९ प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी; उर्वरित १० प्रकरणांत कारवाई सुरू
पुणे, दि. ७ सप्टेंबर २०२६ : स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर महावितरणने थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. भोसरी विभागातील भोसरी, आकुर्डी आणि प्राधिकरण (देयके व महसूल) उपविभागात स्मार्ट मीटरचे सील तोडून ‘सीटी बायपास’द्वारे मीटरची गती कमी करून वीजचोरी केल्याची १९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी ९ प्रकरणांत गुन्हे दाखल करून १२ लाख ४१ हजार रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे. उर्वरित १० प्रकरणांतही दंडाची आकारणी करून वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विशेष म्हणजे, वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये केलेली चलाखी महावितरणच्या ‘स्मार्ट’ तपासणी यंत्रणेनेच हेरली. मीटरचे सील तोडणे, कव्हर उघडणे तसेच सीटी प्रणालीला बगल देऊन वीज वापर कमी दाखविण्याचा प्रयत्न तपासणीमध्ये उघडकीस आला. त्यामुळे स्मार्ट मीटरला चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी कारवाई होत आहे.
चाऱ्होली येथील ‘शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट’ या व्यावसायिक वीज ग्राहकाच्या ठिकाणीही गंभीर स्वरूपाची अनियमितता आढळून आली. या ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करण्यासाठी रिमोट उपकरण बसविल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले. स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करून वीजचोरी करण्याचा हा गंभीर प्रकार महावितरणच्या तपासणीमध्ये पकडला गेला.
स्मार्ट मीटरला छेडछाड केल्यास थेट फौजदारी कारवाई
वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये छेडछाड करणे, सील तोडणे किंवा सीटी बायपास करण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर प्रकार असून, अशा प्रकारांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत विविध कलमांद्वारे दंडात्मक आकारणीसोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कठोर भूमिका महावितरणने घेतली आहे.
गुन्हा दाखल झालेली प्रकरणे
महावितरणच्या कारवाईत खालील वीज ग्राहकांविरुद्ध दिघी, कासारवाडी आणि रावेत पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे :
• शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट, चाऱ्होली = २,६६,८०० रुपये
• सचिन भास्करराव तायडे = १,१८,३६० रुपये
• सुरज संजीवकुमार सूर्यवंशी = १,५३,७७० रुपये
• दयानंद श्रीमंत रसाळ = १,४६,०७० रुपये
• संदीप लक्ष्मण गवळी = १,५६,५९० रुपये
• विष्णू सखाराम चोपडे = १,४०,४१० रुपये
• भगवत नारायण इंगळे = १,४६,६५० रुपये
• आनंद जी. = ६८,८६३ रुपये
• ब्रिजेशदादा बाळासो बुतुगडे = ४३,६२२ रुपये

