४ बेस-४ टॉपची मर्यादा असताना ८ बेस-८ टॉपचा वापर; यंदाच्या दहीहंडी उत्सवातील पुण्यातील पहिली कारवाई
पुणे : दहीहंडी उत्सवासाठी निर्धारित मर्यादेपेक्षा दुप्पट लाऊड स्पीकर्स वापरून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी बिबवेवाडी ओटा परिसरातील श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या अध्यक्षाविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल प्रकाश जगताप (रा. बिबवेवाडी ओटा, बिबवेवाडी) असे मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मंडळावर दाखल झालेला हा पहिला गुन्हा असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रतिक दिलीप करंजे यांनी फिर्याद दिली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वीच ध्वनिप्रदूषणासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या होत्या. दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी ४ बेस आणि ४ टॉप इतकीच साऊंड सिस्टिम वापरण्याची मर्यादा ठेवण्यात आली असून, त्यापेक्षा अधिक स्पीकर्स वापरल्यास कारवाई करून साऊंड सिस्टिम जप्त करण्याचा इशारा देण्यात आला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, बिबवेवाडी ओटा येथील श्रीकृष्ण तरुण मंडळाने दहीहंडी कार्यक्रमासाठी परवानगी घेतली होती. मात्र, लाऊड स्पीकर वापराबाबतच्या आदेशाचा भंग करून प्रत्यक्षात ८ बेस आणि ८ टॉप लावण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषण होऊन परिसरातील नागरिकांना त्रास झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर मंडळाचे अध्यक्ष राहुल जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी कारवाईची माहिती दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक गरड पुढील तपास करीत आहेत.

