पुणे : कर्णकर्कश डीजे आणि लाऊडस्पीकरविरोधात पुणेकर मोठ्या संख्येने एकवटू लागले असून, ‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच’ अर्थात ‘Punekars Against Loudspeakers’ या नावाने सोशल मीडियावर नागरिकांचा मोठा गट तयार झाला आहे. मंचाच्या प्रतिनिधींनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन कर्णकर्कश ध्वनीप्रदूषणासंदर्भात लेखी निवेदन दिले आणि विविध उपाययोजनांची मागणी केली.
केवळ गणेशोत्सवापुरते नव्हे, तर सर्व धार्मिक, जातीय आणि राजकीय मिरवणुकांमध्ये कर्णकर्कश लाऊडस्पीकरच्या वापरावर नियंत्रण आणावे, अशी प्रमुख मागणी मंचाने केली आहे.
कार्यक्रम अथवा मिरवणूक झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अनधिकृत स्पीकर्स आणि जनरेटर सेटची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सध्या चर्चेत असलेल्या ‘चार टॉप-चार बेस’ पद्धतीला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचा दावा करत, प्रत्यक्ष वॅट पॉवर आणि डेसिबल पातळीच्या आधारे ध्वनीवर नियंत्रण ठेवले जावे, अशी भूमिका मंचाने मांडली.
शहरातील विविध ठिकाणची रिअल टाइम ध्वनी-डेसिबल पातळी अधिकृत सरकारी पोर्टलवर नागरिकांना पाहता यावी, यासाठी व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक सार्वजनिक करण्यात यावेत, असेही मंचाने म्हटले आहे.
ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांचे शारीरिक अथवा मानसिक नुकसान झाल्यास त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा पुणे महानगरपालिकेने नुकसानभरपाईची जबाबदारी स्वीकारावी, तसेच पोलिसांनी ध्वनीप्रदूषणासंदर्भात केलेल्या कारवाईचा दैनंदिन अहवाल जाहीर करावा, अशीही मागणी प्रतिनिधींनी केली.
लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाच्या वतीने शहरातील विविध भागांत स्वतः डेसिबल मोजणी करून त्याची नोंद सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कायद्याच्या चौकटीत राहून या उपाययोजना पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि पुण्याच्या प्रथम नागरिकांनी यापूर्वीच संयुक्तपणे करायला हव्या होत्या, अशी भूमिका मंचाने घेतली आहे. आगामी दहीहंडी उत्सवातील पोलिसांची कारवाई ही या संदर्भातील ‘लिटमस टेस्ट’ ठरणार असल्याचेही मंचाने म्हटले आहे.
इतर शहरांमध्ये पोलीस प्रशासनाकडून कर्णकर्कश ध्वनीविरोधात प्रतिबंधात्मक उपाय केले जात असल्याचा उल्लेख करत मंचाने पुणे प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला. “सोलापूरला परंपरेचे भान राखले जाते, नागपुरात कायद्याचा मान राखला जातो, तर पुण्यातच लाऊडस्पीकरला मोकळे रान का? लाऊडस्पीकरमुक्तीत नागपूर आणि सोलापूरला जमलं, मग पुण्यात कुठे अडलं?” असा सवाल मंचाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी मुकुंद किर्दत, ॲड. कुणाल घारे, डॉ. सिमी आठवले, चिंतामणी कांगो, श्रीकांत भिसे आणि सुदर्शन जगदाळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, कर्णकर्कश डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ‘Punekars Against Loudspeakers’ अर्थात लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाच्या वतीने रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बालगंधर्व चौकातील झाशीची राणी पुतळ्यापासून पुणे महानगरपालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

