रामटेकडीतील कचरा प्रकल्पाला विनानिविदा २० वर्षांची मुदतवाढ; १४ विरुद्ध १ मतांनी प्रस्ताव मंजूर झाल्याचा जगतापांचा दावा
पुणे : रामटेकडी येथील ग्रीन पृथ्वी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कचरा प्रकल्पाला कोणतीही नवीन निविदा प्रक्रिया न राबवता तब्बल २० वर्षांची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसचे पुणे पूर्व शहराध्यक्ष तथा स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप यांनी कडाडून विरोध केला आहे. “पुणे शहरातील ८५ टक्के कचऱ्याची विल्हेवाट हडपसर विधानसभा मतदारसंघात लावली जाते. आता अजून किती कचरा हडपसरकरांच्या माथी मारणार?” असा सवाल त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला.
जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन पृथ्वी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाला २० वर्षांची मुदतवाढ देणे आणि या प्रकल्पाशी संबंधित कोट्यवधी रुपयांचे आर्थिक दायित्व स्वीकारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला त्यांनी एकट्याने विरोध केला असून, १४ विरुद्ध १ अशा मतांनी प्रस्ताव मंजूर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अलीकडच्या काळात कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील कंपन्यांना कंत्राटे देण्याचे प्रकार वाढल्याचा आरोपही जगताप यांनी केला. हडपसर परिसरावर शहरातील कचरा व्यवस्थापनाचा मोठा भार आधीच असताना त्याच भागातील प्रकल्पाला आणखी २० वर्षांची मुदतवाढ देणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावरही टीका केली. “हडपसरकरांनी सलग दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून दिला. मात्र या पक्षाकडून हडपसरकरांच्या माथी संपूर्ण पुण्याचा कचरा मारण्याच्या निर्णयांना साथ दिली जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
रामटेकडी परिसरातील कचरा प्रकल्पांचा प्रश्न यापूर्वीही स्थानिक नागरिकांच्या आरोग्य, दुर्गंधी आणि पर्यावरणाच्या मुद्द्यांवरून चर्चेत राहिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला दीर्घ मुदतवाढ देण्याच्या निर्णयावरून आता राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

